fbpx Press "Enter" to skip to content

केंद्र सरकारकडून कोरोना मृताच्या कुटुंबाला ४ लाख रूपये नुकसान भरपाई मिळणार?

केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबाला रु. ४ लाख नुकसान भरपाई (Rs 4 lakh relief to each Covid victim) देण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यासोबत एक फॉर्म देखील फिरवला जातोय.

व्हायरल मेसेज:

केंदाच्या आपत्ती व्यवस्थापनकडून कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबाला रु. ४ लाख नुकसान भरपाई मिळणार. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फाॅर्म पाठवित आहे. गरजूंना कळवा.

Advertisement

या अशा मेसेजसह निधीचा दावा करण्यासाठी लागणाऱ्या अर्जाची पीडीएफ सुद्धा व्हायरल होत आहे.

Viral message ss to claim ex gratia for covid dead family checkpost marathi fact
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी, अमितराजे तळोदे आणि बी.आर. औटी यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेले हे मेसेज निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली. असेच दावे फेसबुक आणि ट्विटर याठिकाणी सुद्धा पहायला मिळत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने ऍडव्हान्स्ड की वर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करू पाहिले तेव्हा नेमके प्रकरण लक्षात आले.

१. कोरोना मृताच्या कुटुंबाला भरपाई मिळावी अशी याचिका

केंद्र आणि राज्य सरकारांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी कोरोना मृताच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये नुकसान भरपाई (Rs 4 lakh relief to each Covid victim) द्यावी अशा मागणीची याचिका ऍड. दीपक कंसाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यासोबतच त्यांनी असेही नमूद केले की मृत व्यक्तीचे शव-विच्छेदन होत नसल्याने मृत्यूचे खरे कारण मृत्यू दाखल्यावर नोंदवले जात नाहीये. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातलगांना अधिकृत कागदावर मृत्यूचे खरे कारण लिहून मिळायला हवे.

२. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

सदर याचिकेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोरोना मृतांच्या मृत्यू दाखल्यावर मृत्यूचे स्पष्ट कारण आणि ४ लाख रुपयांच्या भरपाई विषयी उत्तर मागवले आहे. यासाठी १० दिवसांचा वेळ देऊन पुढील सुनावणी ११ जून रोजी होईल असे न्यायालयाने सांगितले आहे.

३. केंद्र सरकारने व्हायरल दाव्यास फेक घोषित केले

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या ‘PIB’ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल मेसेज आणि त्यासोबतच्या फॉर्मला फेक घोषित केले आहे. SDRF- राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे अशा प्रकारे कुठलीही नुकसान भरपाई जाहीर केलेली नाही असे यात नमूद केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. आजघडीला तरी राज्य अथवा केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोरोना मृताच्या कुटुंबियांना रु. ४ लाख नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केलेले नाही. या विषयीची याचिका न्यायप्रविष्ठ आहे. ११ जून २०२१ रोजी कदाचित केंद्र शासनाच्या उत्तराने यात आधी स्पष्टता येईल. नव्या बाबी येथेच अपडेट करण्यात येतील.

अपडेट: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ४ लाखाच्या नुकसान भरपाईबाबत उत्तर दिले. महामारी आटोक्यात आणण्यासाठी खर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. मृतांचे प्रमाण ३,८५,००० पेक्षा अधिक आहे. ही संख्या येत्या काळात अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे ४ लाखाची नुकसानभरपाई प्रत्येकास देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

हे ही वाचा: कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासनातर्फे वार्षिक ५० हजार रुपये मिळवून देणारे दावे फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा