बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी पार पडले असून दुसर्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोनू सूद यांनी बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांना मतदान करण्याचे आवाहन (sonu sood support tejaswi Yadav) केल्याचा दावा केला जातोय.
व्हायरल फोटोत सोनू सूद आणि एक व्यक्ती राष्ट्रीय जनता दलाचे पोस्टर घेऊन उभे राहिलेले दिसताहेत. या पोस्टरवर ‘मतदान करें पलायन मुक्त बिहार के लिए, तेजस्वी भव: बिहार’ असा मेसेज दिसतोय. अनेक जणांकडून हा फोटो शेअर केला जातोय आणि सोनू सूद यांनी बिहारच्या विकासासाठी तेजस्वी यादव यांना मतदान करण्याचे आवाहन (sonu sood support tejaswi Yadav) केल्याचा दावा केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च केला असता दैनिक जागरणच्या वेबसाईटवरील एका बातमीत हा फोटो आम्हाला आढळला. मात्र मूळ फोटोत सोनू सूदच्या हातातील फोटो हा राष्ट्रीय जनता दलाचे पोस्टर नसून सोनू सूद यांचेच एक पेंटिंग आहे.
बातमीनुसार झारखंडच्या जमशेदपूरमधील कलाकार अर्जुन दास यांनी सोनू सूद यांच्या लॉकडाऊनमधील सेवाभावी कार्यप्रतीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचं पेंटिंग बनवलं होतं. अर्जुन दास यांनी मुंबईला जाऊन सोनू सूद यांना हे पेंटिंग भेट दिलं. त्यावेळचा हा फोटो आहे. पेंटिंगमध्ये सोनू सूद यांचे आई-वडील देखील आहेत.
पडताळणी दरम्यान आम्हाला अर्जुन दास यांच्या ट्विटर हॅण्डलवरून १९ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडीओ देखील मिळाला. ज्यात सोनू सूद स्वतः अर्जुन दास यांचं कौतुक करताना दिसताहेत.
बिहार निवडणुकी दरम्यान सोनू सूद यांनी कुठल्या पक्षाला समर्थन दिलंय का हे शोधण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारची कुठलीही बातमी आम्हाला मिळाली नाही. उलट २८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी सोनू सूद यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. ज्यात ते कुठल्याही पक्षाचं नाव न घेता केवळ विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन करताना दिसताहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेता सोनू सूद यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एडिटेड आहे. सोनू सूद यांनी बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव किंवा राष्ट्रीय जनता दलाला पाठिंबा दिलेला नाही.
हे ही वाचा- मतदारांना पैसे वाटताना तेजस्वी यादव कॅमेऱ्यात कैद?
Be First to Comment