सोशल मीडियावर भारतात 5G टेस्टिंगमुळे कोरोनाची दुसरी लाट (5g testing and corona) आल्याचा दावा केला जातोय. एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर केलं जातंय. यात देशातील कोरोना प्रसारास 5G टेस्टिंगला जबाबदार ठरवताना ही टेस्टिंग बंद करण्याची मागणी करण्यात आलीये.
5G टॉवरमधून विषारी वायू निघत असून तो हवेत मिसळल्यानंतर लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने लोक मरताहेत. 5G टेस्टिंग बंद केल्यास लगेच परिणाम दिसून येतील. त्यामुळे 5G टेस्टिंग लवकरात लवकर बंद करण्यात यावी, असंही यात म्हंटलंय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर 5G टेस्टिंग आणि कोरोनाचा काही संबंध (5g testing and corona) आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. माध्यमांमधील बातम्यांनुसार दूरसंचार मंत्रालयाने 4 मे 2021 रोजी 13 दूरसंचार कंपन्यांना देशात 5G टेस्टिंग करण्याची परवानगी दिली आहे. चीनी कंपन्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की देशभरातील दूरसंचार कंपन्यांना 4 मे 2021 या तारखेपूर्वी 5G टेस्टिंगची परवानगीच नव्हती. त्याचवेळी देशाचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी निकराचा लढा साधारणतः गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. त्यामुळे 5G टेस्टिंगचा आणि कोरोनाच्या प्रसाराचा काहीच संबंध नाही, हे इथेच स्पष्ट होते.
दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की उपलब्ध माहितीनुसार दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग हे जगातील असे देश आहेत, ज्या देशात संपूर्णतः 5G नेटवर्क आहे. म्हणजेच जर 5G मुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकत असेल, तर कोरोनाच्या सर्वाधिक केसेस या देशांमध्ये असायला हव्या होत्या. मात्र कोरोनाच्या जगभरातील आकडेवारीची माहिती ठेवणाऱ्या वेबसाइटनुसार या दोन्ही देशात आजघडीला कोरोनाच्या अनुक्रमे 8162 आणि 119 केसेस आहेत. ही गोष्ट देखील कोरोनाचा आणि 5G यांचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्ट करणारी आहे.
भारतात जरी 5G नेटवर्कमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा सध्या व्हायरल होत असला तरी जगभरातील इतर देशांमध्ये अशा प्रकारचे दावे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासूनच केले जात होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील आपल्या तथ्य पडताळणीच्या विभागात 5G नेटवर्कमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा खोडून काढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की रेडिओ तरंगाच्या माध्यमातून कोरोना विषाणू पसरू शकत नाही. जगभरातील अशा अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होतोय, ज्या देशात 5G नेटवर्क उपलब्ध नाही.
केंद्र सरकारकडून देखील 5G नेटवर्कमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भारतात 5G टेस्टिंगमुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा सोशल मीडियावरील दावा संपूर्णतः चुकीचा आहे. 5G टेस्टिंगचा आणि कोरोना विषाणूचा कसलाही संबंध नाही. 5G नेटवर्कमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या दाव्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.
भारतातील 5G टेस्टिंगला केवळ 3 दिवसांपूर्वी दूरसंचार मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. शिवाय जगभरातील 5G नेटवर्क नसलेल्या अनेक देशांमध्ये देखील कोरोनाचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे.
हे ही वाचा- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या बँक खात्यावरील विम्याचे २ लाख मिळणार? वाचा सत्य!
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]