Press "Enter" to skip to content

देशी दारूने कोरोनावर इलाज केल्याचे सांगणाऱ्या बोधेगावच्या डॉक्टरांचे दावे दिशाभूल करणारे!

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगावच्या डॉ. अरुण भिसे (Dr. Arun Bhise) यांच्या नावे सोशल मीडियातून एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कोरोनावर देशी दारू कसा रामबाण उपाय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

Advertisement

“पेशंटवर त्याच्या संमतीने ट्रायल घेण्याचे ठरवले आणि आतापर्यंत जवळपास 50 पेशंटवर (त्यातील जवळपास 10 पेशंट सिरीयस होते) त्यांना बेड न मिळाल्याने ते नाविलाजाने घरीच उपचार घेत होते…अशा पेशंटला शासकीय तज्ञ समितीने ठरवून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे उपचार सुरू केले व सोबत पेशंटला 30 ml देशी दारू सकाळी संध्याकाळी 30 ml पाण्यासोबत घेण्याची विनंती केली….ज्यांचा माझ्या वर पुर्ण विश्वास होता त्यांनी हा उपाय केला…आणि त्यातील 100% रूग्ण बरे झाले…अजूनही काही पेशंटला हा उपाय सुरू आहे…जे बरे झाले त्यांना मी हुशार आणि तज्ञ लोकांसमोर रिपोर्ट घेऊन पुराव्यानिशी बोलवून घेऊ शकतो..!”

– डाॅ. अरूण ताराचंद भिसे
सिताई हाॅस्पिटल, मु.पो. बोधेगाव ता.शेवगाव जि अहमदनगर

हा असा दावा त्यांनी व्हायरल पोस्टमध्ये केला आहे. या पोस्ट व्हॉट्सऍपवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमरदीप पवार यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

हेच दावे फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

डॉ. अरुण भिसे यांनी स्वानुभव कथन केला आहे.*योग्य औषधी (30ml) मात्रेत देशी दारू (अल्कोहोल) हाच ठरतोय उपयुक्त कोरोना…

Posted by Amrut Kale on Tuesday, 11 May 2021

अर्काइव्ह लिंक

याच दाव्यास ‘राष्ट्र सह्याद्री’ नामक स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्धी दिलीय. याचेही कात्रण सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

May be an image of text
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल दाव्याची पडताळणी करताना आढळलेल्या महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे-

  • अल्कोहोलने कोरोना विषाणू मरू शकतो का?

व्हायरल दाव्याची पडताळणी करताना आम्ही विविध आरोग्यविषयक बातम्या देणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट आणि जागतिक आरोग्य संघटनेचे कोव्हिड१९ विषयक माहितीपत्रक अभ्यासले. या सर्वांच्या मते ६०% अल्कोहोलची मात्रा असलेले द्रावण जर त्वचेवर लावले तर कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो परंतु ते पिल्याने कोरोनाला फरक पडत नाही, उलट कोरोना व इतर इन्फेक्शनविरुद्ध लढण्यासाठी ज्या प्रतिकारशक्तीची गरज आहे, तिलाही अल्कोहोल कमजोर बनवते. त्याशिवाय दारूमध्ये अल्कोहोल व्यतिरिक्तही इतर केमिकल्स असतात ज्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

  • अल्कोहोल आणि DRDOच्या औषधाच्या फॉर्म्युल्यात साधर्म्य?

डॉ. भिसे यांनी आपला दावा खरा कसा आहे हे मांडण्यासाठी व्हायरल पोस्ट्समध्ये DRDOच्या औषधाच्या आणि अल्कोहोलच्या केमिकल फॉर्म्युल्यात साधर्म्य असल्याचे म्हंटले आहे.

‘द हिंदू’च्या बातमीनुसार केवळ ‘इमर्जन्सी’ वापरासाठी DRDOने तयार केलेले कोव्हीड औषध म्हणजे 2-Deoxy-D-Glucose हे रसायन आहे. याचा केमिकल फॉर्म्युला C6H12O5 असा आहे तर अल्कोहोलचा फॉर्म्युला C2H5OH असा आहे. या दोन्ही फोर्म्यूल्यांकडे पाहिल्यास त्यांच्यातील C,H,O एकसारखेच आहेत केवळ आकडे बदलले म्हणून त्यांत साधर्म्य आहे असे म्हणणे अडाणीपणाचे ठरेल.

H2O या फोर्म्यूल्याने पाणी तयार होते तर H2O2 या फोर्म्यूल्याने ‘हायड्रोजन पॅराक्सॉईड’ तयार होते. O च्या मागे केवळ 2 हा आकडा आल्याने थेट केमिकल बदलले. ‘हायड्रोजन पॅराक्सॉईड’ जखम धुण्यासाठी वापरतात. हे जर थेट पिले तर विष म्हणून काम करते.

  • डॉक्टरच्या दाव्यात गडबड

व्हायरल पोस्ट आणि बातमीमध्ये डॉ. भिसे (Dr. Arun Bhise) यांनी ५० रुग्णांवर दारूच्या सहाय्याने उपचार केल्याचे सांगितले आहे. परंतु अहमदनगरच्या जागरूक नागरिक मंचच्या सुहास मुळे आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या फोनवरील संवादात त्यांनी २५ रुग्णांवर उपचार केले आणि त्यातील एकाचे निधन झाले असे सांगितले आहे. २५ असो वा ५० ही रुग्णसंख्या कुठल्याही शास्त्रीय निष्कर्षाप्रत येण्यासाठी पुरेशी नाही. वैज्ञानिक पद्धतीने सँपलिंगसाठीचा आकडा याहून फार मोठा असावा लागतो.

  • बरे झालेल्या रुग्णांना नियमावलीनुसार औषधीसुद्धा चालू होती

त्याच व्हायरल दाव्यात असे लिहिले आहे की ICMRने सांगितलेल्या नियमानुसार आधुनिक औषधांचा डोस सुद्धा चालू होता आणि सोबतच या डॉक्टरांच्या दारूची मात्राही होती. मग बरे झालेले रुग्ण नेमके औषधांनी बरे झाले की दारूने हे डॉक्टरांना कसे कळाले? त्यामुळे कोरोनावर दारूचा ईलाज सांगण्याला डॉक्टरांकडे नेमका काय पुरावा आहे हे समजणे अनाकलनिय आहे.

  • डॉ. भिसे यांची चौकशी सुरु

देशी दारूचा काढा कोरोना आजारावर उपयुक्त असल्याचा दावा करत देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, तर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश दिले असल्याची बातमी लोकमत ने प्रसिद्ध केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये बोधेगावच्या डॉ. भिसे (Dr. Arun Bhise) यांनी देशी दारू कोरोनावर इलाज असल्याचे सांगणारा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या दाव्यास कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. सोशल डीस्टन्सिंग, मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर व योग्यवेळी योग्य वैद्यकीय उपचार हाच मार्ग कोरोनापासून वाचवू शकतो.

हे ही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने कोरोना जातो सांगणारे व्हायरल दावे फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा