सोशल मीडियात सध्या भारतीय रेल्वेच्या नावाने एक परिपत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. परिपत्रकानुसार रेल्वेकडून १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंतच्या (trains till 30 september) कालावधीतील गाड्या रद्द करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
परिपत्रकानुसार नियमित मालवाहू, एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी अशा सगळ्याच गाड्या रद्द करण्यात आल्याचं सांगितलंय. १० ऑगस्ट २०२० रोजीचं हे परिपत्रक आहे.
सदरील पत्रकातील मजकूर अधिकृत पत्रकाप्रमाणेच दिसत असल्याने हे सोशल मीडियावर खुलेपणाने शेअर केले जात आहे. अनेक जणांचा परिपत्रक शेअर करण्यामागे इतरांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे हाच उदात्त हेतू आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक किशोर सोनावणे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.
कदाचित याच पत्रकाच्या आधारे इकॉनॉमीक टाईम्स, पंजाब केसरी, न्यूज नेशन, दैनिक भास्कर यांसारख्या राष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा ३० सप्टेंबर पर्यंत रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
पडताळणी:
सर्वच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगणाऱ्या या पत्रकात रेल्वे खात्याचा उल्लेख आहे. त्यामुळे याविषयीची रेल्वे मंत्रालयाने काही अधिकृत माहिती दिली आहे का हे तपासून पाहिले.
जुन्या अधिकृत परिपत्रकानुसार १२ ऑगस्ट पर्यंत नियमित रेल्वे सेवा बंद केली होती.
परंतु १२ ऑगस्ट नंतरच्या गाड्यांचे काय? बातम्यानुसार खरेच ३० सप्टेंबर पर्यंत नियमित सेवा बंद राहणार आहे का?
हे तपसण्याकरिता आम्ही रेल्वे मंत्रालयाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट तपासले असता, प्रकाशित बातम्यांचे खंडन करणारे ट्विट सापडले.
‘काही माध्यमसंस्था ३० सप्टेंबर पर्यंत (trains till 30 september) रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या बातम्या देत आहेत. त्या चुकीच्या असून अशा प्रकारचे कुठलेही नवे परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने काढलेले नाही. विशेष गाड्या सुरूच राहतील.’ असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणीत हे समोर आले की जुन्या पत्रकाप्रमाणे रेल्वेची नियमित सेवा १२ ऑगस्ट बंद करण्यात आली होती. परंतु तेथून पुढे ३० सप्टेंबर २०२० पर्यंतच्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचा दावा करणारे पत्रक आणि बातम्या खोट्या आहेत. तसेच सर्व विशेष गाड्यासुद्धा पूर्वीप्रमाणेच नियमित सुरू राहतील.
हेही वाचा: ‘कोरोना आजार नाही, षडयंत्र’ म्हणणाऱ्या डॉ. निलेश पाटील यांचे दावे दिशाभूल करणारे!
Be First to Comment