Press "Enter" to skip to content

चीनचे ५ सैनिक मारल्याच्या बातम्या मिडीयाने दिल्या; पण चीनी पत्रकाराच्या भरोश्यावर

भारत-चीन सीमेवरील तणावात सोमवारी मध्यरात्री गल्वान खोऱ्यात तीन भारतीय सैनिक शहीद झाल्याचं भारतीय सैन्याकडून जाहीर करण्यात आलं. १९७५ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या हिंसक चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्याचं देखील सांगण्यात येतंय.

काल दिवसभर भारतीय सैन्याने देखील ५ चीनी सैनिकांना यमसदनी पाठविल्याच्या  तसेच ११ चीनी सैनिकांना जखमी केल्याच्या बातम्या देखील भारतीय मिडियामध्ये चालवल्या गेल्या.  

‘रिपब्लिक भारत’ ‘झी न्यूज’ ‘टाईम्स नाऊ‘पत्रिका’इंडिया टीव्ही’यांनी यासंबंधीच्या बातम्या दिल्या. इतरही काही ठिकाणी या बातम्या आहेत. संबंधित बातम्या फक्त उदाहरणादाखल.

या न्यूज चॅनल्सच्या दिग्गज पत्रकारांनी आपापले वैयक्तिक ट्विट्स सुद्धा केले.

पडताळणी:

भारतीय माध्यमांमध्ये चालविण्यात आलेली ही बातमी ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनी वृत्तपत्राच्या रिपोर्टर वँग वेनवेन यांच्या ट्वीटच्या आधारे देण्यात आली होती.

ट्वीटमध्ये भारत-चीन सीमेवरील तणावात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ अर्थात चीनच्या सैन्याचे ५ सैनिक मारले गेले आणि ११ सैनिक जखमी झाल्याचे वँग वेनवेन यांनी म्हंटले आहे.

याच ट्वीटच्या आधारे भारतीय माध्यमांमध्ये बातम्या चालवल्या जायला लागल्यानंतर मात्र ‘ग्लोबल टाईम्स’ या न्यूजपेपरने ट्वीच्या माध्यमातून या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं.

सीमेवरील चकमकीत चीनचं नेमकं किती नुकसान झालं याबाबतीत आम्ही अधिकृतरीत्या काहीही रिपोर्ट केलेलं नाही. याक्षणी आम्ही आकड्याची खातरजमा करू शकत नाही, असं ‘ग्लोबल टाईम्स’ने आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं.

‘ग्लोबल टाईम्स’ने याप्रकरणी अंग काढून घेतल्यानंतर वँग वेनवेन यांनी देखील बचावात्मक पवित्रा घेतला. आपल्या आधीच्या ट्वीटवर स्पष्टीकरण देताना त्यांनी एक नवीन ट्वीट केलं.

गंमत अशी की या ट्वीटमध्ये आपल्या आधीच्या ट्वीटमधील माहिती ‘न्यूज लाईन लाईफ’ या भारतीय सूत्राच्या आधारे देण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलंय. चकमकीत झालेल्या नुकसानीची चीनकडून अधिकृतरीत्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. आपल्या ट्वीटला चीनची अधिकृत भूमिका मानणे, भारतीय मिडीयाच्या अव्यवसायिकतेचं लक्षण असल्याचं देखील त्यांनी म्हंटलंय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये हे स्पष्ट झाले आहे की भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार चकमकीत दोन्ही बाजूचं नुकसान झालंय, पण ज्याप्रमाणे तीन भारतीय सैनिक शहीद झाल्याचं भारतीय सैन्याकडून जाहीर करण्यात आलंय, त्याचप्रमाणे चीनचे किती सैनिक मारले गेले, अथवा जखमी झाले यासंबंधीची माहिती मात्र भारतीय सैन्याकडून देण्यात आलेली नाही.

भारतीय माध्यमांमध्ये ज्या चायनीज रिपोर्टरच्या ट्वीटच्या आधारे ‘५ चायनीज सैनिक मारले गेल्याची आणि ११ सैनिक जखमी झाल्याची बातमी चालविण्यात आली, त्या रिपोर्टरनेच या प्रकरणी बचावाची भूमिका घेतली आहे. आपल्या माहितीचा स्रोत एका भारतीय वेबसाईटची बातमी असल्याचं सांगितल्याने हे ट्वीट किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न उरतो.

संबंधित रिपोर्टरने भारतीय माध्यमांवर अव्यवसायिकतेचा आरोप केलाय. भारतीय माध्यमांच्या गुणवत्तेविषयी वेगळी चर्चा होऊ शकते परंतु कुठल्याही विश्वसनीय सुत्रांशिवाय भारत-चीन तणावासारख्या इतक्या संवेदनशील विषयावर ट्वीट करणे आणि परत त्याची जबाबदारी नाकारणे यातून आधी रिपोर्टर वँग वेनवेन यांना स्वतःची व्यावसायिकता तपासण्याची आवश्यकता निश्चितच आहे.

अपडेट- ताज्या माहितीनुसार गल्वान खोऱ्यातील चकमकीत २० पेक्षा अधिक भारतीय सैनिक शहीद झाल्याचं समजतंय. सोबतच चीनचे देखील ४३ सैनिक मारले गेले असल्याची बातमी ANI या न्यूज एजन्सीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

चीनचे ४३ सैनिक मारले गेले असल्याची बातमी देखील सूत्रांच्या आधारे देण्यात आली आहे. चीनकडून अधिकृतरीत्या चीनचं किती नुकसान झालं हे जाहीर कारण्यात आलेलं नाही.

हेही वाचा: उद्धव ठाकरे यांची संपत्ती मोजताना मिडियाची आकडेमोड चुकली

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा