Press "Enter" to skip to content

जगात ६२ लाख रुग्ण, मोदी म्हणतायेत १ कोटी कोरोना रुग्णांवर इलाज केला. खरंय का?

जगभरात कोटभर कोरोना रुग्ण नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या १ कोटी कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केल्याचा दावा कसा काय करत आहेत?

असा सवाल करत काही ट्विटर युझर्स ‘इंडिया टीव्ही’ या न्यूज चॅनलचा स्क्रिनशॉट फिरवत आहेत.

‘१ कोटी कोरोना रुग्णांचा मोफत इलाज केला असा दावा मोदी करत आहेत, पण सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखाच्या खाली आहे. आज घडीला संपूर्ण जगात ६२ लाख रुग्ण आहेत. रॉयल स्टॅग इफेक्ट?’

असं कॅप्शन दुष्यंत नावाच्या ट्विटर युझरने दिलंय. त्यांच्या बायोनुसार ते ‘मुंबई मिरर’ मध्ये स्तंभ लेखक आहेत. हेच ट्विट चित्रपट दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ यांनी देखील रीट्विट केलं आहे. अशा जवळपास ३३००हून अधिक लोकांनी हे ट्विट रीट्विट केलंय.

पडताळणी:

‘इंडिया टीव्ही’च्या ज्या बातमीचा आधार घेऊन हे ट्विट केलं जातंय ती बातमी ‘चेकपोस्ट मराठी’ने शोधून व्यवस्थित तपासली. ३१ मे २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ‘इंडिया टीव्ही’ने लाइव्ह प्रक्षेपण केले होते.

या संवादात पंतप्रधानांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या ठळकपणे कळाव्यात म्हणून भाषणादरम्यान स्क्रीनवर महत्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवले जात होते.

प्रक्षेपणाच्या २५ व्या मिनिटाला हे ग्राफिक्स आपल्यासमोर येते. त्यावर मुद्दा क्रमांक ६ म्हणून ‘१ करोड कोरोना मरीजों का फ्री में इलाज किया गया’ असं लिहिलं होतं.

परंतु आम्ही जेव्हा मोदींचं भाषण व्यवस्थित ऐकलं, तेव्हा वेगळ्याच गोष्टी आम्हाला समजल्या. काय म्हणाले ते पहा:

“साथियो हमारे देश के गरीब दशकोसे एक बहोत बडी चिंता में रेहते आये है. अगर बिमार पड गये तो क्या होगा? अपना इलाज कराये या फिर परिवार के लिये रोटी की चिंता करे? इस तकलीफ को समझते हुये इस चिंता को दूर करने के लिये ही करीब डेढ साल पेहले आयुष्मान भारत योजना शुरू की गयी थी. कुछ ही दिन पेहले आयुष्मान भारत के लाभार्थीयोंकी संख्या एक करोड के पार हो गयी है. एक करोड से ज्यादा मरीज मतलब देश के एक करोड से अधिक परिवार की सेवा हुई है.“

१ कोटी रुग्णांच्या संदर्भात व्हिडीओच्या १७.२१ मिनिटापासून पुढे आपण ही वरची वाक्ये ऐकू शकतो.

वस्तुस्थिती:

पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या ट्वीटच्या पडताळणीमध्ये ‘चेकपोस्ट मराठी’ला काय गवसलं?

  • मोदींवर करण्यात आलेल्या या व्हायरल ट्विटसोबत जोडलेला स्क्रीनशॉट ‘इंडिया टीव्ही’चाच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या लाइव्ह प्रक्षेपणाच्या वेळी ‘इंडिया टीव्ही’ने चालवलेल्या ग्राफिक्सचा हा स्क्रिनशॉट आहे.
  • परंतु, ‘इंडिया टीव्ही’ने लावलेले ग्राफिक्स आणि पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे यांत मोठी गफलत झालेली आहे.
  • मोदींनी उल्लेख केलेले १ कोटी रुग्ण हे कोरोनाचे नसून दीड वर्षांपूर्वी चालू केलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत इलाज करण्यात आलेल्या रुग्णांचा आजवरचा आकडा आहे.
  • चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी रीट्विट केलेल्या, मुंबई मिरीरचे स्तंभ लेखक दुष्यंत यांचे व्हायरल होत असलेले ट्विट ज्या ‘इंडिया टीव्ही’च्या ग्राफिक्सचा आधार घेत आहेत ते ग्राफिक्स चुकीचे आहे.

त्यामुळे जगभरातच कोटभर कोरोना रुग्ण नसताना मोदींनी १ कोटी कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केल्याचा दावा चुकीचा ठरतो. अशा चुकीच्या दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वर अडवत आहोत.

हेही वाचा:

सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिला चक्क फेक गोष्टीचा दाखला

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा