Press "Enter" to skip to content

पोस्ट खात्याकडून सब्सिडी अंतर्गत ६००० रुपये मिळविण्याच्या आमिषापायी लिंकवर क्लिक करू नका!

भारतीय पोस्ट (India Post) खाते म्हणजेच डाक विभाग सबसिडी योजनेतून नागरिकांना ६००० रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे मेसेज सध्या व्हॉट्सऍपवर व्हायरल होतायेत. मेसेजखाली लिंकसुद्धा दिली गेलीय, यावर क्लिक करून संधीचा लाभ घेता येईल असा त्या मेसेजचा उद्देश आहे.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड आणि अस्मिता भौमिक यांनी सदर मेसेज व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने अशा प्रकारच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाखाली गिफ्ट, लकी ड्रॉ, सबसिडी वगैरे आमिष दाखवणाऱ्या मेसेजेसची वेळोवेळी पोलखोल केलीय. त्यामुळे अशा मेसेजकडे पाहताक्षणीच त्याचे गौडबंगाल लक्षात येते.

जसे की या व्हायरल मेसेजमध्ये चित्रात भारतीय डाक विभागाचा लोगो दिसतोय, शेजारी www.indianpost.gov.in असेही दिसतेय परंतु ज्या लिंकवर आपणास क्लिक करावयाचे आहे त्यात majorityhowl असं भलतचं काही दिसतंय. त्याचा शेवटही ‘.gov’ ने होत नाहीये म्हणजेच ती अधिकृत शासकीय वेबसाईट नाहीये.

तरीही त्यावर आपण क्लिक केलेच तर ओपन होणारी वेबसाईट भलतीच काहीतरी असते. त्याच्या URLमध्ये कुठेही भारतीय डाकचा उल्लेख नसतो.

याहून गमतीची गोष्ट म्हणजे वेबसाईट खरीखुरी असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्यावर पोस्ट खात्याचा लोगो, राजमुद्रा इत्यादी बाबी टाकलेल्या असतात. एवढेच नव्हे तर आपला विश्वास बसावा म्हणून काही लोकांच्या कमेंट्स त्यात असतात. या कमेंट्स लाईक करण्याचे चिन्ह असते पण ते दाबले जात नाही. ती कमेंट नेमकी कधी केली गेलीय यासाठी दिलेली वेळ कितीही तासांनी कोणत्याही दिवशी ओपन करून पाहिल्यास आहे तेवढीच दिसते.

यामध्ये दिलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे देत गेल्यास शेवटी लकी ड्रॉ झाल्याचा भास निर्माण केला जातो. निवडलेल्या बॉक्स मधून नोटा दिसतात परंतु ती रक्कम आपल्या खात्यात जमा करण्यासाठी सदर लिंक ५ ग्रुप्स आणि २० मित्रांना पाठविण्यास सांगितले जाते. एवढे केल्यानंतरही पैसे काही मिळत नाही उलट आपण जसजसे क्लिक करतो तसतसे रीडायरेक्ट होऊन भलत्यासलत्या वेबसाईट ओपन होऊ लागतात.

या गोंधळात आपल्या मोबाईलचा आयपी अड्रेस समोर जातो, नको त्या वेबसाईटवर री डायरेक्ट झाल्यानंतर भलतेच व्हायरस, स्पायवेअर, मालवेअर आपल्या फोनमध्ये आपोआप डाऊनलोड होण्याची शक्यता वाढते आणि त्यातून आपली वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहचण्यास मदत होते. यातून आपल्या बँक खात्यातील रकमेलासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो.

केंद्रीय माहिती आणि सूचना मंत्रालयाअंतर्गत असलेल्या PIBने अधिकृत ट्विट करत हे मेसेज फेक असून भारतीय डाक विभागाने अशी कुठलीही योजना काढली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भारतीय डाक खात्याच्या नावे ६००० रुपयांच्या सबसिडीचे आमिष दाखवत व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. त्यावर क्लिक करून आपण आपल्या वैयक्तिक माहितीस, बँक खात्यातील पैशांना धोक्यात आणत आहोत.

हेही वाचा: तुमची KBC च्या २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी निवड झाल्याचे मेसेज आल्यास सावधान!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा