गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात ‘आयसीयु’ वार्डमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडीओ दणदणीत व्हायरल होतोय. ही घटना गुजरातची असून ज्या व्हेंटीलेटरच्या ब्लास्टमुळे (gujarat ventilator blast) आग लागलीय त्याच्या कंपनीच्या मालकाचे राजकीय कनेक्शन असल्याचे दावे या व्हिडीओसोबत करण्यात येताहेत. याविषयीच्याच महत्वाच्या माहितीचा ‘स्पेशल रिपोर्ट’.
काय आहे दावा?
‘गुजरातमध्ये कोरोना ICU वार्डमध्ये वेंटिलेटर ब्लास्ट… मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या मित्राची कंपनी हे वेंटिलेटर सप्लाय करते…..
हि बातमी कुठलीही मिडिया दाखवणारं नाही.’
या कॅप्शनसह व्हॉट्सऍपवर व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली, निलेश मालानी आणि अनिल कचरे यांनी निदर्शनास आणून दिले.
अशाच अर्थाच्या पोस्ट फेसबुकवरसुद्धा व्हायरल होतायेत.
महत्वाचे ‘फॅक्ट्स’:
‘चेकपोस्ट मराठी’ने या दाव्यांसंबंधी पडताळणी केली असता काही ‘फॅक्ट्स’ सापडले. जे जे गवसलं ते ते इथे १० मुद्द्यांच्या आधारे मांडत आहोत. यातून संपूर्ण घटनेचे आकलन होणे सोपे जाईल.
१. आग व्हेंटीलेटरमुळे लागली का?
व्हायरल व्हिडीओ आणि विविध बातम्यांमध्ये गुजरातच्या वडोदरामधील ‘एसएसजी’ हॉस्पिटल स्टाफने सांगितल्याप्रमाणे प्रथमदर्शनी तरी ही आग व्हेंटीलेटरमध्ये झालेल्या ब्लास्ट मुळेच ((gujarat ventilator blast)) लागली आहे असे दिसते.
त्या उपकरणाच्या आसपास शॉर्ट सर्किट झाल्याचे काही दिसून आले नाही. म्हणजेच या आगीस बाहेरचे काही कारण नव्हते. तरीही ‘फॉरेन्सिक चाचणी’ झाल्याशिवाय आगीचे कारण व्हेंटीलेटरच ((gujarat ventilator blast)) होते का? हे सांगणे शक्य नाही असे संबंधित अधिकारी म्हणताहेत.
२. हे व्हेंटीलेटर ‘धमन’ होते?
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार ज्या व्हेंटीलेटरमुळे आग लागली असे म्हंटले जात आहे, ते ‘धमन’ ब्रांडचे व्हेंटीलेटर होते. हे धमन व्हेंटीलेटर तयार करणारी कंपनी आहे गुजरातमधीलच ‘ज्योती सीएनसी’.
३. धमन व्हेंटीलेटरला DCGI लायसन्स नाही
महत्वाच्या वैद्यकीय साधनांना तयार करण्यासाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’चे लायसन्स असणे गरजेचे असते त्याशिवाय आपण उत्पादन करू शकत नाही. धमन व्हेंटीलेटर तयार करणाऱ्या ‘ज्योती सीएनसी’कडे DCGIचे लायसन्स नाही असा विरोधकांनी आरोप केला होता. हे खरे सुद्धा आहे. परंतु मार्चमध्ये देशातील व्हेंटीलेटरची गरज पाहता DCGIने नियमांत बदल करून लायसन्सची गरज नसल्याचे सांगितले होते.
४. व्हेंटीलेटरची चाचणी कशी झाली?
‘ज्योती सीएनसी’ने गुजरातमधील विविध हॉस्पिटल्सना जवळपास एक हजार धमन व्हेंटीलेटर दान केले. परंतु ‘अहमदाबाद मिरर’ सोबत बोलताना कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जडेजा यांनी कबुली दिली की या व्हेंटीलेटरची टेस्टिंग केवळ एका रुग्णावर झाली आहे. ही चाचणी अहमदाबादच्या सिव्हील हॉस्पिटलमधील कमिटीसमोर झाली. या कमिटीत क्रिटीकल केअर एक्स्पर्ट असायला हवे होते परंतु त्या जागी डॉ. कमलेश उपाध्याय नावाचे भूलतज्ज्ञ होते. असा बातमीत उल्लेख आहे.
५. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा आणि पराक्रमसिंह जडेजांचा सलोखा
अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी लॉकडाऊन नंतर गांधीनगर मधील आपले घर एकदाच सोडले, ते सुद्धा अहमदाबादच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये झालेल्या ‘धमन’ व्हेंटीलेटरच्या उद्घाटनासाठी.
मुख्यमंत्र्यांनी विविध माध्यमांतून कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पराक्रमसिंह जडेजा यांचे कौतुक केले आहे.अगदी पंतप्रधानांनी MSMEसाठी पॅकेज जाहीर केल्याचे कौतुक करण्यासाठी जडेजा यांनी जो व्हिडीओ शूट केला तो सुद्धा मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्वतःच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
६. हे व्हेंटीलेटर नसून अंबू बॅग:
विविध माध्यमांतून ‘ज्योती सीएनसी’ने १० दिवसांत व्हेंटीलेटर तयार केल्याच्या बातम्या दिल्या गेल्या, तब्बल ९०० व्हेंटीलेटर दान केल्याच्या बातम्याही सर्वत्र पसरल्या. स्वस्तात व्हेंटीलेटर तयार झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकातून कौतुक केले. गुजरात सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागानेही दिलेल्या पत्रकात या मशीनचा व्हेंटीलेटर असाच उल्लेख होता. ‘ज्योती सीएनसी’ने सुद्धा ब्रोशरमध्ये यास व्हेंटीलेटर असेच संबोधले होते.
परंतु जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर्सने हे व्हेंटीलेटर नसून ‘मेकॅनिकल अंबू बॅग’ असल्याचे स्पष्ट केले आणि गुजरातच्या आरोग्य विभागाला ‘हाय एंड’ व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करावा अशी मागणी केली तेव्हा पितळ उघडे पडले. मग पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना घुमजाव करत जडेजा म्हणाले की आम्ही यास ‘व्हेंटीलेटर’ कधी म्हणालोच नव्हतो.
७. काय फरक आहे व्हेंटीलेटर आणि अंबू बॅग मध्ये?
‘द क्विंट’च्या रिपोर्टनुसार ‘व्हेंटीलेटर’ हे साधारण २ लाख ते १० लाख रुपयांचे असते. हे याचा पाईप घशातून थेट फुफ्फुसात टाकतात जो कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छवास घेण्यास मदत करतो. ‘व्हेंटीलेटर’वर पल्स रेट, ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी गोष्टी दिसून येतात.
अंबू बॅग म्हणजे तोंडावर ऑक्सिजन मास्क सोबत एक फुगा असतो. त्याने श्वासोच्छवास घेण्यास मदत केली जाते. हे ‘धमन १’ म्हणजे ‘मेकॅनिकल अंबू बॅग’ आहे. तो फुगा मशीनने प्रेस होतो. साध्या अंबू बॅगची किंमत साधारण १५०० ते ३००० एवढी असते तर ‘मेकॅनिकल अंबू बॅग’ची फार फारतर ७ ते ८ हजार असू शकते.
८. ज्योती सीएनसी-विराणी कुटुंब-मोदी सूट:
‘द वायर‘च्या हाती लागलेल्या दस्तावेजानुसार स्मित विराणी हे ‘ज्योती सीएनसी’चे २० टक्के स्टेकहोल्डर आहेत. सेबीच्या वेबसाईटवर २०१३ साली अपडेट केलेल्या दस्तावेजानुसार ‘ज्योती सीएनसी’च्या प्रोमोटर्समध्ये विराणी कुटुंबातील दोन-तीन प्रमुख लोकांची नावे स्टेकहोल्डर्स म्हणून वाचण्यास मिळतात. जडेजा यांनी या दाव्यांना फेटाळत विराणी हे २०१९ पर्यंतच स्टेकहोल्डर होते असे सांगितले आहे.
हिऱ्यांचे व्यापारी असलेल्या स्मित विराणी यांच्या लग्नाचे निमंत्रण म्हणून त्यांचे वडील रमेशभाई विराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१५ मध्ये ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे सूक्ष्म अक्षरात लिहिलेलेला सूट दिला होता. तत्कालीन बातम्यांनुसार त्या सूटची किंमत १० लाख रुपये होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दिल्लीत आले होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जाताना मोदींनी हा सूट घातला होता.
९. पदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘धमन’ची ऑर्डर रद्द केली
माध्यमांमधून अतिशय गवगवा झाल्यानंतर ‘धमन’ व्हेंटीलेटर्सला विविध राज्यांनी ऑर्डर दिली होती, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुसज्ज राहता येईल. परंतु ‘धमन’ बाबत जसजसे एकेक आक्षेप बाहेर येऊ लागले तसतसे पदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून या मशीन्सची ऑर्डर कॅन्सल करण्याचे ठरवले. याविषयी त्यांनी ट्विटसुद्धा केले होते.
१०. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘PIB’ गुजरात सरकारच्या पाठीशी?
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने ‘द वायर’च्या ‘ज्योती सीएनसी’ आणि गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी व नरेंद्र मोदी यांच्याशी कसे कनेक्शन आहे हे सांगणारा जो रिपोर्ट होता त्यावर थेट ‘फेक’ असा शिक्का मारलाय. ‘वायर’च्या रिपोर्टमधील कुठलाही मुद्दा खोडून न काढता केवळ ‘हे व्हेंटीलेटर्स गुजरात सरकारने विकत घेतले नसून कंपनीने दान केले होते’ असे म्हंटले आहे.
मुळात संपूर्ण बातमीत ‘द वायर’ने कुठेही असा दावा केला नाहीये नाहीये की ‘गुजरात सरकारने या व्हेंटीलेटर्सची ऑर्डर दिली होती.’ त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था भाजपशाषित सरकारचा बचाव करण्यसाठी समोर येताहेत असा आरोप करण्यात येतोय.
हे ही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पेरलेल्या महत्वाच्या फेक न्यूजची पोलखोल!
[…] हे ही वाचा- ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मालक… […]
[…] हेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मालक… […]
[…] हेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मोदी… […]