‘४०३ वर्षांपूर्वीचे इंग्रजांनी काढलेले पहिले बुद्धनाणे, या दुर्मिळ नाण्याचा इतिहास जाणून घ्या!’ अशा मथळ्याखाली गौतम बुद्धांची प्रतिमा असलेल्या नाण्याच्या दोन्ही बाजूंचे फोटोज असलेल्या एका बातमीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होतोय. गौतम बुद्धांची (Gautam Buddha) प्रतिमा ब्रिटिशकालीन नाण्यांवर (british coin) देखील होती, असा दावा केला जातोय.
‘जे भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना समजलं ते भारतात जन्मलेल्या लोकांना समजले नाही. हेच भारताच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे.’ असाही मजकूर काही स्क्रिनशॉटवर पहायला मिळतोय.
फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणत हे दावे मागच्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत.
पडताळणी:
- आम्ही व्हायरल नाण्यांचे फोटो गुगलवर रिव्हर्स सर्च करून पाहिले. परंतु हे फोटो कुठल्या अधिकृत वेबसाईट किंवा संस्थेच्या माहितीशी संलग्न असल्याचे आढळले नाही.
- नाण्यावर ‘१६१६’ असे साल आहे. परंतु इतिहासाचा थोडासा अभ्यास असेल तरीही हे लक्षात येईल की ‘इस्ट इंडिया कंपनी’ भारतात आली ३१ डिसेंबर १६०० रोजी. त्यानंतर आपला जम बसवण्यात, विविध राजांशी हातमिळवणी करण्यातच कंपनीला बरीच वर्षे गेली.
- ‘ब्रिटानिका‘वरील माहितीनुसार कंपनीने भारतीय राज्यकारभाराची सूत्रे खऱ्या अर्थाने १८व्या शतकात ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तोवर नाणी टंकित करण्याचा त्यांना न अधिकार होता न त्यामागे काही हेतू असण्याचे तार्किक कारण होते.
- नाणे संग्राहक आणि इतिहास अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या माहितीनुसार अशी देवी देवतांची किंवा जुन्या धाटणीची नाणी आता नव्याने निर्माण करत ‘अँटीक’ म्हणून विकली जातात. अशी नाणी चोर बाजारापासून अँटीक शॉपमध्ये अव्वाच्या सव्वा किमती लाऊन विकली जातात. यांचा इतिहासाशी तिळमात्र संबंध नाही.
- रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर विविध कालखंडातील नाण्यांचे फोटोज आहेत. इंग्रजांच्या नाण्यांवर एका बाजूला राणी एलिझाबेथचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्या नाण्याचे मूल्य लिहिलेले असायचे. यात कुठेही कोणत्याही धर्माच्या देवी-देवतांची चित्रे असलेले नाणे नाही.
- सदर व्हायर दाव्यांचे मूळ असलेली बातमी धम्मचक्र नावाच्या वेब पोर्टलची असल्याचे व्हायरल स्क्रिनशॉटमधून समजते. व्हायरल बातमी ३१ मे २०१९ रोजी प्रकाशित झाली होती. परंतु त्या साईटवर जाऊन शोधाशोध केली असता १४ एप्रिल २०१९ नंतर थेट ११ जून २०१९ रोजीची बातमी दिसते आहे. म्हणजेच चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बातमी डिलीट करून टाकली असावी.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दाव्यांसह फिरणारी नाणी फेक असल्याचे निष्पन्न झाले. ब्रिटीश इंडिया कंपनीने गौतम बुद्धांची प्रतिमा असलेले नाणे (Gautam Buddha on british coin) कधीच टंकित केले नव्हते. त्यामुळे अँटीक वस्तू म्हणून देवभोळेपणाने भावनिक होऊन मोठी किंमत मोजत स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.
हेही वाचा:राम मंदिर निर्मितीच्या आनंदात स्पेन मध्ये ढोलताशे? फेक दावे व्हायरल!
Be First to Comment