Press "Enter" to skip to content

केवळ १० सेकंद श्वास रोखून धरू शकलात म्हणजे तुम्ही कोरोना मुक्त असल्याचा दावा फेक!

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये एका रेषेतील मीटर बघायला मिळतंय. या मीटरवरचा पॉइंटर ‘ए’ पासून ‘बी’ पर्यंत जाईपर्यंतच्या १० सेकंदांच्या कालावधीत जर तुम्ही यशस्वीरित्या श्वास रोखून धरू शकलात, तर तुम्ही कोरोना मुक्त असल्याचा दावा (holding breath for 10 second coronavirus) केला जातोय.

एम.डी. शमीम अहमद या फेसबुक युजरने पोस्ट केलेला हा व्हिडीओ जवळपास ५८०० युजर्सकडून शेअर केला गेलाय.

10 second covid test fb viral post
Source: Facebook

अर्काइव्ह पोस्ट

अशाच प्रकारचा दावा ट्विटरवर देखील केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही काही किवर्डसच्या मदतीने संशोधन केलं असता आम्हाला जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय, 

“तुम्ही जर १० सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळेसाठी न खोकता अगदी सहजतेने श्वास रोखून धरु शकत असाल तर याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही कोरोना व्हायरस किंवा इतर कुठल्याही फुप्पुसाच्या आजारांपासून मुक्त आहात.”

जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय की तुम्हाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोरोना टेस्ट करून घेणे. श्वसनाच्या प्रयोगाने तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही, हे समजू शकत नाही.

पडताळणी दरम्यान आम्हाला मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहीम युनूस यांचं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये डॉ. युनूस स्पष्ट करतात की कोरोना व्हायरसचा संसर्ग  झालेला तरुण रुग्ण आपला श्वास १० सेकंदांपेक्षा जास्त काळ धरु शकतो. याउलट अगदी कोरोना मुक्त असलेल्या वृद्ध व्यक्तीस देखील कदाचित १० सेकंदासाठी श्वास रोखायला जमणार नाही. त्यामुळे १० सेकंद श्वास रोखू शकणारी व्यक्ती कोरोना मुक्त असल्याचा दावा (holding breath for 10 second coronavirus) चुकीचा आहे.

पडताळणी दरम्यान आयआयटी मद्रासचे एक संशोधन देखील आमच्या बघण्यात आले. या संशोधनात तर दावा करण्यात आलाय की श्वास रोखून धरल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. हे संशोधन ‘फिजिक्स ऑफ फ्लुइड्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आयआयटी मद्रासच्या एप्लाइड मेकॅनिक्स विभागाचे प्राध्यापक महेश पंचग्नुला सांगतात की, संशोधना दरम्यान आम्हाला असे आढळून आले की श्वास रोखून धरल्याने किंवा कमी प्रमाणात श्वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये व्हायरस जमा होण्याची शक्यता वाढते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केवळ १० सेकंद श्वास रोखून धरू शकलात म्हणजे तुम्ही कोरोना मुक्त आहात, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असाच काहीसा दावा रामदेव बाबा यांनीसुद्धा ‘एबीपी न्यूज’वर केला होता. या दाव्याला कुठलाही वैज्ञानिक अथवा वैद्यकीय आधार नाही.

आयआयटी मद्रासच्या संशोधनानुसार श्वास रोखून धरल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे सोशल मीडियावरील उलट-सुलट दाव्यांना बळी न पडता कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घेणे हेच सर्वात महत्वाचे.

हे ही वाचा- ‘सरकारी कीट’वर टाकलेल्या नळाच्या पाण्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा