Press "Enter" to skip to content

नॅशनलाइज बँक अकाऊंट धारकाचा ३१ जून २०२० पर्यंत मृत्यू झालेला असल्यास २ लाख मिळणार?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की जर का एखाद्या व्यक्तीचा १ एप्रिल २०१९ ते ३१ जून २०२० दरम्यानच्या काळात मृत्यू झाला असेल आणि त्या व्यक्तीचे एखाद्या नॅशनलाइज बँकेत अकाउंट असेल तर मृताच्या वारसदारांना भारत सरकरतर्फे दोन लाख रुपये देण्यात येताहेत.

भारत सरकारतर्फे देण्यात येणारे २ लाख रुपये मृतांच्या वारसाला मिळवून देण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत व्हिडीओ पोचविण्याचे आवाहन देखील करण्यात येतेय.

असे आवाहन व्हाट्सअपवर व्हायरल होत असल्याचे चेकपोस्ट मराठीचे वाचक सुनील गिरकर यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी

व्हायरल व्हिडीओमधील दावा बऱ्यापैकी संशयास्पद असल्याने आम्ही या व्हिडीओची पडताळणी केली. व्हिडीओमधील पहिली तथ्यात्मक चूक अशी की मुळात जून महिना हा केवळ ३० दिवसांचा असताना या व्हिडिओत ३१ जून या तारखेचा उल्लेख करण्यात आलाय.

‘शिवस्वराज्य ऑनलाईन क्लासेस’ या युट्यूब चॅनलवर साताऱ्यातील ऋषिकेश जाधव या तरुणाने साधारणतः दहा मिनिटांचा हा व्हिडीओ अपलोड केलाय. व्हिडिओत ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ या दोन विमा योजनांविषयी माहिती देण्यात आलीये. पण ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचे आमच्या लक्षात आले.

माहिती कशाप्रकारे दिशाभूल करणारी आहे हे समजून घेण्यासाठी आधी या योजनांची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. म्हणून मग आम्ही योजनांची अचूक माहिती मिळविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिली.

काय आहेत योजना ?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ या दोन्हीही भारत सरकारच्या विमा योजना आहेत. दोन्हीही योजनांची सुरुवात २०१५ सालापासून करण्यात आली असून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी २ लाखांचे संरक्षण देणारी योजना आहे, तर जीवन ज्योती योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यूच्या प्रकरणात २ लाखांचे संरक्षण देणारी योजना आहे.

दोन्हीही योजनांचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

व्हायरल व्हिडिओत दावा करण्यात आलाय की १ एप्रिल २०१९ ते ३१ जून २०२० दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे जर नॅशनलाईज बँकेत अकाउंट असेल तर फक्त एवढंच करायचंय की बँकेत जाऊन मृत व्यक्तीच्या बँक खात्याचं १ एप्रिल २०१९ ते ३१ जून २०२० दरम्यानच्या कालावधीतील बँक स्टेटमेंट घ्यायचंय.

बँक स्टेटमेंटमध्ये जर कुठेही ३६० रुपये किंवा १२ रुपये कपात करण्यात आलेले असतील तर याचा अर्थ असा की मृताचे वारसदार ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ किंवा ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ योजनेंतर्गत भारत सरकारकडून २ लाख रुपये मिळविण्यास पात्र आहेत.

३६० आणि १२ रुपये कपात ही नेमकी काय भानगड ?

कपातीच्या ह्या आकड्यांचा संबंध दोन्हीही विमा योजनांच्या वार्षिक हफ्त्याशी आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हफ्ता ३६० रुपये आहे, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक हफ्ता १२ रुपये आहे.

दोन्हीही योजनांचा लाभ १ जून ते ३१ मे या कालावधीत घेता येतो. म्हणजेच जर नॅशनलाईज बँकेत अकाउंट असणाऱ्या एखादी व्यक्ती दोन्ही पैकी एखाद्या विमा योजनेत सहभागी असेल तरच तिला त्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळू शकेल.

एखाद्या व्यक्तीचे नॅशनलाईज बँकेत अकाउंट असेल आणि ठराविक कालावधीत तिचा मृत्यू झाला असेल, परंतु ती कुठल्याही योजनेत सहभागी नसेल तर व्हायरल व्हिडिओतील दाव्याप्रमाणे तिच्या वारसदारांना २ लाख रुपये मिळण्याचा काहीएक संबंध नाही. त्यासाठी मृत व्यक्ती योजनेत सहभागी असणं आवश्यक आहे.

दुसरी गोष्ट अशी की केवळ मृत व्यक्तीच्या बँक स्टेटमेंटमध्ये ३६० रुपये किंवा १२ रुपये कपात झालेली आहे, म्हणजे ती व्यक्ती २ लाख रुपये मिळविण्यासाठी पात्र असल्याचे समजणे देखील चुकीचे. एखादी व्यक्ती योजनेत सहभागी नसेल आणि तिने इतर कुठल्याही गोष्टीसाठी ३६० रुपये किंवा १२ रुपयांचा ऑनलाईन व्यवहार केला असेल, तर बँक स्टेटमेंटमध्ये कपात रक्कम म्हणून १२ किंवा ३६० हा आकडा दिसणारच हे अगदीच सहाजिक आहे. याचा अर्थ ती व्यक्ती २ लाख मिळविण्यासाठी पात्र ठरत नाही.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडिओमधील दावे अर्धवट माहिती देणारे, दिशाभूल करणारे तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी योजनांची माहिती देताना अतिसुलभीकरण करून लोकांना आकर्षून घेण्याच्या प्रयत्नात हा गोंधळ निर्माण झाला असल्याचे स्पष्ट होते आहे.

हे ही वाचा- जुन्या टीव्ही-रेडीओमध्ये करोडोच्या भावात जाणारी ‘रेड मर्क्युरी’? जाणून घ्या सत्य की अफवा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा