आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सीरो सर्व्हेच्या माध्यमातून चिंता कमी करणारी बातमी दिली आहे. आयसीएमआरने देशातल्या ७० जिल्ह्यातल्या ३४ हजार लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक हॉटस्पॉट ठिकाणच्या ३० टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आणि त्यांना समजलं देखील नाही.
आयसीएमआरने ७० हजार लोकांची टेस्ट केल्यानंतर त्यांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचा दावा हिंदी न्यूज चॅनेल ‘एबीपी न्यूज’ने केला आहे.
कोरोनाची लागण झालेले हे ३० टक्के रुग्ण कुठल्याही औषधींशिवाय, कुठल्याही वैद्यकीय उपचारांशिवाय, हॉस्पिटलमध्ये न जाता बरे झाले, असाही दावा ‘एबीपी न्यूज’ने आयसीएमआरच्या सर्वेक्षणाच्या आधारे या बातमीत केलाय.
‘एबीपी न्यूज’चं मराठी भावंड ‘एबीपी माझा’ने देखील ‘कन्टेन्मेंट झोनमधील ३० टक्के कोरोनाबाधित आपोआप कोरोनामुक्त, ICMR चा sero-survey अहवाल’ या हेडलाईनसह ही बातमी दिली आहे.
एबीपी समूहा व्यतिरिक्त इंग्रजीत ‘सीएनबीसी टीव्ही १८’ने ICMR’s sero-survey: Report suggests 30% people in containment zones exposed to coronavirus and recovered ही बातमी दिलीये. ‘एबीपी माझा’ आणि ‘सीएनबीसी टीव्ही १८’ दोहोंनीही ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध बातमीच्या आधारे बातमी प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलंय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने या बातम्यांची पडताळणी करायला घेतली त्यावेळी एक लक्षात आलं की ‘एबीपी न्यूज’ने थेट आयसीएमआरच्याच हवाल्याने बातमी दिली आहे. परंतु ‘एबीपी माझा’ आणि ‘सीएनबीसी टीव्ही १८’ने मात्र ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये प्रकाशित बातमीचा संदर्भ दिला आहे.
काय आहे ‘एक्स्प्रेस’च्या ‘त्या’ बातमीत.?
‘सीएनबीसी टीव्ही १८’ने संदर्भ म्हणून दिलेली ‘एक्स्प्रेस’ची ‘ती’ बातमी आम्ही शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘सीएनबीसी टीव्ही १८’ने दिलेल्या लिंकवर क्लिक करून आम्ही थेट ‘द हिंदू’च्या सेरेना जोसेफाईन एम यांनी २१ मे रोजी दिलेल्या बातमीवर जाऊन पोहोचलो.
‘सीएनबीसी टीव्ही १८’ने आपल्या बातमीत एका ओळीत असं म्हंटलय की आम्ही स्वातंत्र्यरित्या बातमीच्या सत्यतेची खातरजमा केलेली नाही. मात्र आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की ‘सीएनबीसी टीव्ही १८’ने बातमीची तर नाहीच, पण संदर्भाची देखील खातरजमा केलेली नाही. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’चा संदर्भ देऊन घाईघाईत ‘द हिंदू’ची जुनी बातमी वाचकांच्या माथी मारण्यात आलेली आहे.
‘द हिंदू’च्या या बातमीत चेन्नई येथे आयसीएमआर मार्फत सिरो सर्व्हे सुरु असल्याचं बातमीत सांगितलंय. देशभरातील ६९ जिल्ह्यांमधील २४००० जणांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार असून कंटेनमेंट झोनमधल्या १० शहरांमधील ५ हजार नमुने देखील तपासले जाणार आहेत.
पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ने विकसित केलेल्या ‘एलिसा’ कीटच्या सहाय्याने कोरोना विरोधातील अँटीबॉडीजचा शोध घेण्याचा उद्देश आहे, असे आयसीएमअआर चेन्नईचे संचालक मनोज मुर्हेकर यांनी ‘द हिंदू’च्या सेरेना जोसेफाईन एम यांच्याशी बोलताना सांगितलं होतं.
त्यानंतर आम्ही ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ची बातमी देखील शोधली. ‘15-30% people in containment areas exposed to COVID-19: ICMR’s serosurvey’ या शिर्षकासह एक्स्प्रेसच्या सुमी सुकन्या दत्ता यांनी बातमी दिली आहे. मुख्य प्रवाहातील इतर माध्यमांमध्ये आणि सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले कोरोना संदर्भातील बहुतेक दावे याच बातमीच्या आधारे केले जात असल्याचे आम्हाला ही बातमी वाचल्यानंतर लक्षात आले. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने ही बातमी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने देत असल्याचे सांगितले आहे.
एक्स्प्रेसच्या बातमीत सुत्रांविषयी स्पष्टता नसल्याने ह्या विषयावर आयसीएमआरचं नेमकं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या शोधात आम्हाला आयसीएमआरच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेलं ट्वीट मिळालं. त्यात आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे की ‘आयसीएमआरच्या सीरो सर्व्हे संदर्भात माध्यमांमध्ये करण्यात येत असेलेले दावे काल्पनिक आहेत. अद्यापपर्यंत सर्वेचे निष्कर्ष निश्चित करण्यात आलेले नाहीत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की आयसीएमआरमार्फत सीरो सर्व्हे करण्यात येत आहे. मात्र सर्व्हेच्या आधारे समोर आलेले निष्कर्ष अद्यापपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इतक्यात मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आणि कुठल्याही वैद्यकीय उपचारांशिवाय ते बरे देखील झाले असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही.
लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ डेव्हलप झाल्यानंतर असे परिणाम बघायला मिळतील. परंतु त्याची सुनिश्चिती आयसीएमआर सारख्या संस्थेकडून होईपर्यंत वाट पाहणेच शहाणपणाचे.
हे ही वाचा
मोराला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा ‘प्रोटोकॉल’ आहे का?
[…] […]