Press "Enter" to skip to content

रशिया विरोधातल्या युद्धात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की स्वतः उतरले युद्धभूमीवर?

युक्रेन-रशिया युद्धात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी दाखवलेल्या लढाऊ बाण्याचे जगभरात कौतुक होत आहे. बलाढ्य रशियाच्या आक्रमणानंतर देश सोडून जाण्यास नकार देत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, असे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, सोशल मीडियावर झेलेन्स्की यांचा लष्करी गणवेशातील फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की रशियन सैन्याशी दोन हात करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की स्वतः युद्धभूमीवर उतरले आहेत.

दैनिक लोकमतच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून झेलेन्स्की यांचा हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील झेलेन्स्की यांचे फोटोज साधारणतः अशाच दाव्यांसह व्हायरल होताहेत.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ‘अल जझीरा’च्या वेबसाईटवर 9 एप्रिल 2021 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. फोटोच्या कॅप्शनमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सीमारेषेजवळील युक्रेनियन सैन्य छावण्यांना भेट दिली असे सांगण्यात आले आहे. युक्रेनिअन प्रेस सर्व्हिसच्या सौजन्याने हा फोटो सदर बातमीमध्ये वापरण्यात आला आहे.

Alzajeera news cutting
Source: Aljazeera

हाच फोटो ‘टाईम मासिक’ आणि ‘युरो न्यूज’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातम्यांमध्ये देखील बघायला मिळाला. या दोन्हीही बातम्या एप्रिल 2021 मधील आहेत.

कोण आहेत वोलोडिमिर झेलेन्स्की?

वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे आजोबा सायमन झेलेन्स्की (Simon Zelensky) यांनी सोव्हिएत रशियाच्या रेड आर्मीमधून हिटलरच्या विरोधातील युद्धात भाग घेतला होता.

सध्या युक्रेनच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेले झेलेन्स्की हे एकेकाळी अभिनेते आणि कॉमेडिअन होते. कॉमेडिअन म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या झेलेन्स्की यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आंदोलन उभा करत 2019 सालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता.

रशियन आक्रमणाला धीरोदात्तपणे तोंड देणाऱ्या युक्रेनचा अध्यक्ष ही सध्या झेलेन्स्की यांची ओळख बनली आहे. ‘हिटलरला हरवले होते, आता पुतीनलाही हरवू’ हे त्यांचे वक्तव्य देखील चर्चेत आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की युक्रेनचे राष्ट्रपती स्वतः युद्धभूमीवर उतरल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेला फोटो सध्याचा नसून जवळपास वर्षभरापूर्वीचा आहे.

हेही वाचा- प्रेमाचा संदेश देणारा व्हायरल फोटो अप्रतिमच, पण तो सध्याच्या युद्धजन्य युक्रेनमधला नाही!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा