Press "Enter" to skip to content

शरीरातील ऑक्सिजन मोजण्याचा दावा करणारे ऍप्स कितपत विश्वासार्ह?

कोव्हीड१९ महामारीने जग त्रस्त असताना शरीरातील ऑक्सिजन मोजणारे तंत्रज्ञान स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध झाल्याचे दावे होत आहेत.

Advertisement

कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचावासाठी आपल्या प्रियजनांकडून सातत्याने नवनवे नुस्खे आणि केअर टिप्स फॉरवर्ड होत असतात. असाच एक मेसेज सध्या व्हॉट्सऍपवर फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रशांत गावडे यांनी निदर्शनास आणून दिलेला आहे.

काय आहे हा मेसेज?

whatsapp forward to info about oximeter app
Source: Whatsapp

‘कृपया प्रत्येकाने शरीरातील ऑक्सिजन लेव्हल सांगणारे हे ऍप आपापल्या मोबाईलमध्ये घ्या आणि कोव्हीड१९च्या काळात रोज आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजा. जर ती पातळी ९० च्या खाली आली तर ताबडतोब डॉक्टरांना संपर्क साधा.’

असे लिहून खाली त्या ऍपची लिंक आणि ते इन्स्टॉल करण्याची पद्धती दिलेली आहे.

पडताळणी:

व्हायरल मेसेजमधील दाव्याची पडताळणी करण्यापूर्वी हे प्लस ऑक्सिमीटर नेमकं काय आहे हे समजून घ्यायला हवं.

डॉक्टर्सच्या मते कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तरी प्रत्येकाच्याच जीवावर बेतेल असे नाही, बऱ्याचदा तो आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीने आपोआप बरा सुद्धा होऊ शकतो. चिंतेची बाब केवळ अशा लोकांची आहे ज्यांच्या रक्तातील ऑक्सिजन लेव्हल ढासळते, मग त्यांना बाहेरून ऑक्सिजन पुरवावा लागतो.

यासाठी अनेक डॉक्टर्सनी ऐपत असेल तर चिमट्याप्रमाणे दिसणारं पल्स ऑक्सिमीटर हे यंत्र विकत घेण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे.

दिल्ली सरकार आणि पल्स ऑक्सिमीटर:

दिल्ली सरकारकडून २१ जून २०२० रोजी लक्षणे नसणाऱ्या किंवा कमी लक्षणे असणाऱ्या ‘होम आयसोलेशन’ मधील रुग्णांना दहा दिवसांसाठी हे यंत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील बातमी आपण वाचू शकता.

१३ जुलै रोजीच्या NDTVच्या बातमीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पल्स ऑक्सिमीटरला सुरक्षा कवच म्हंटलं आहे. होम आयसोलेशनमधील मृत्यूदरात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दर्जेदार ऑक्सिमीटर महागडे:

ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्सवर आम्ही या उपकरणाची चौकशी केली तेव्हा बरे रीव्ह्युव्ज असणारे हे उपकरण एक हजार रुपयांच्या पुढेच असल्याचे निदर्शनास आले. दर्जानुसार ही किंमत जवळपास अडीच तीन हजाराच्या घरात जातेय.

अशात जर कुणी मेसेज पाठवूनआणि मोबाईल ऍपद्वारे पल्स आणि ऑक्सिजन लेव्हल समजू शकत असल्याचं सांगत असेल तर नक्कीच कुणाचेही लक्ष तिकडे जाणारच.

मोबाईल ऍप लेव्हल मोजण्यासाठी कितपत विश्वासार्ह?

The Centre for Evidence-Based Medicine (CEBM) नावाची एक संस्था आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न असणारी ही संस्था आरोग्य विज्ञानातील विविध बाबींचे संशोधन आणि पुराव्यासह आपले निष्कर्ष मांडत असते.

संस्थेने १९ मे २०२० रोजी सादर केलेल्या रिसर्चपेपर मध्ये आपले म्हणणे मांडले आहे:

“कोणतेही स्मार्टफोन तंत्रज्ञान रक्ताच्या ऑक्सिजन पातळीच्या मोजमापासाठी वैद्यकीयदृष्ट्या अचूक आहे याचा पुरावा नाही. शिवाय, अशा तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक आधार शंकास्पद आहे. अशा तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त ऑक्सिजन पातळीवर रुग्णांच्या नैदानिक ​​मूल्यांकनांवर विश्वास ठेवू नये.”

CEBM research verdict

या ऍप्सद्वारे आपली सुरक्षा धोक्यात येऊ शकते:

यातील बहुतांश ऍप वापरण्यासाठी आपल्याला आपली बोटे कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर ठेवावी लागतात. मग ते स्कॅन करून आपल्याला रिपोर्ट दाखवते.

फोर्ब्ज मासिकाने २ नोव्हेंबर २०१९ रोजी एक रिपोर्ट पब्लिश केलाय. या रिपोर्टनुसार हॅकर्सच्या टीमने आपल्या स्मार्टफोनमधून निघालेल्या फिंगर प्रिंट्सच्या फोटोजचा वापर करून आपली खाजगी माहिती काढता येऊ शकते, असा दावा केलाय.

चायनीज हॅकर्सच्या या टीमकडून फिंगरप्रिंट स्कॅनद्वारे ओपन केले जाणारे स्मार्टफोन्स, ऍप्स अवघ्या २० मिनिटात खोलू शकत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे हे ऑक्सिमीटर ऍप (oximeter app) तर सोडाच इतरही ऍप जिथे फिंगर प्रिंटचा फोटो निघण्याची शक्यता आहे असे ऍप वापरणे धोकादायक आहे.

ऑक्सिमीटर उपकरण कसे काम करते?

चिमटासदृश्य दिसणारे हे उपकरण जेव्हा आपण बोटाला अडकवतो तेव्हा ते एका बाजूने लाईट सोडते आणि बोटाच्या आरपार गेलेली लाईट दुसऱ्या बाजूला जाऊन धडकते. किती लाईट पोहोचली यावरून हे उपकरण आपले पल्स म्हणजे हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजन लेव्हलचे मोजमाप करते.

ऑक्सिमीटर ऍप (oximeter app) कसे काम करते हे अधिक जाणून घेण्यासाठी युट्युबवर काही चांगले व्हिडीओज सुद्धा उपलब्ध आहेत. यातून आपल्याला हे सहज लक्षात येईल की मोबाईल ऍप्समध्ये अशी काही टेक्नोलॉजी असण्याची शक्यता कितपत आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये शरीरातील ऑक्सिजन मोजण्याचा दावा करणारे ऑक्सिमीटर ऍप (oximeter app) वैद्यकीयदृष्ट्या अजिबात विश्वासपात्र नाही असे स्पष्ट झाले आहे. किंबहुना हे ऍप जी टेक्नोलॉजी वापरतात तीच कितपत सुरक्षित आहे यावरच मोठी शंका आहे. घायचं असेल तर चांगल्या दर्जाचे पल्स ऑक्सिमीटर विकत घेऊ शकता.

आरोग्यविषयक उपाययोजना म्हणून जे काही आपण वापरतोय ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे की नाही याचा पडताळा केल्याशिवाय वापरणे म्हणजे स्वतःचे आयुष्य धोक्यात घालण्यारखेच आहे.

कुठल्याही फॉरवर्डवर विश्वास ठेवण्याआधी ‘चेकपोस्ट मराठी’च्या ९१७२०११४८० या अधिकृत नंबरवर व्हॉट्सऍप मेसेज करून पडताळणी नक्की करून घ्या.

हेही वाचा: कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा