Press "Enter" to skip to content

पुराच्या पाण्यात भगवद्गीतेचे एकही पान ओले झाले नाही? दैवी चमत्कार की वैज्ञानिक कारण?

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती तयार झाली होती. यावेळी पुरात वाहून आलेल्या भगवद्गीतेचे एकही पान भिजले नव्हते. हे केवळ दैवी चमत्कारानेच शक्य असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

‘पुराच्या पाण्यात भगवदगिता वाहुन आली तरीही एकही पान ओले झाले नाही’ या अशा मेसेजसह २.१३ मिनिटाचा व्हिडीओ व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. फेसबुक, युट्युब या माध्यमांवरही या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण मोठे आहे.

प्रा. नारायण भोसले, प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घुले, दिनेश सूर्यवंशी, सुनीत अनगळ, विजय मोहिते, बळीराम पाटील, बळीराम घोलप, राजेंद्र काळे, राज कांबळे आणि दिनेश सूर्यवंशी या ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचकांनी आमच्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून सदर व्हिडीओची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

  • सर्वात आधी आम्ही व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यासोबत असणारी माहितीही ऐकली. त्यातून व्हिडीओमध्ये पाण्यातून भगवद्गीता उचलणारी व्यक्ती ‘विजय कारखेले’ असल्याचे समजले.
  • व्हिडीओत उल्लेख असल्याप्रमाणे ‘आदर्श शिक्षक विजय कारखेले’ या कीवर्डसचा वापर करून शोधाशोध केली असता फेसबुकवर त्यांची प्रोफाईल सापडली. त्यांनी स्वतःच्या वॉलवर ३१ ऑगस्ट रोजी ५.५६ मिनिटांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे. बातमी करेपर्यंत हा व्हिडीओ जवळपास ३ हजार लोकांनी पाहिला होता.
Source: Facebook
  • आम्ही विजय कारखेले यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणेच सर्व माहिती त्यांनी जशीच्या तशी दिली. सोबतच ते असेही म्हणाले की,

“एकूण प्रकाराकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले असता त्या पुस्तकाची बांधणी ‘एअर टाईट’ म्हणावी अशी होती त्यामुळे ते तरंगत राहिले असावे. परंतु ज्या शेतकऱ्याच्या घरातून भगवद्गीता वाहत बाहेर आली त्याच्या शेळ्या, बदके, कपडे, धान्य अशा बऱ्याच गोष्टी वाहून गेल्या. जाळीत अडकल्याने अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अक्षरशः घरातील काहीच शिल्लक राहिलं नाही. एवढं नुकसान झालं परंतु भगवद्गीता मात्र जशी आहे तशीच तिथे तरंगत राहिली हा मला तरी चमत्कारच वाटतोय.”

– विजय कारखेले (शिक्षक)
  • कारखेले यांच्या मुद्द्यांना धरून आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले. परंतु त्यांची उत्तरे तर्काच्या कसोटीवर टिकणारी नव्हती. ‘चेकपोस्ट मराठी’चे प्रश्नं आणि कारखेले यांची उत्तरं आम्ही वाचकांसमोर ठेवतोय.

१. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की पुस्तकाची पाने नव्या कोऱ्या पुस्तकाप्रमाणे सरळ नाहीत, सुरकुतलेली दिसतायेत. म्हणजेच त्याला ओल लागलेली आहे असे आपणास वाटत नाही का?

उत्तर: जेव्हा मी ते उचलण्यासाठी पाण्यात पाय टाकला तेव्हा आणि मी ओल्या हाताने उचलले तेव्हा त्यावर थोडेफार पाणी लागले असावे.

bhagvdgeeta floats on water

हे उत्तर ग्राह्य धरायचे झाल्यास त्यातून परत अनेक प्रश्न उभे राहतात.

१) पाने एकमेकांना चिकटून त्यांचा गठ्ठा तयार कसा झाला? २) त्या पानांच्या वळ्या कशा झाल्या? त्यातील पाने उलटताना एकेक सुटे पान न उलटता थेट गठ्ठा कसा उलटला जातोय? ३) पुस्तकाच्या मागची बाजू, पाने उलगडण्याची बाजू भिजलेली कशी दिसतेय? याचाच अर्थ असा की सदर उत्तर पटण्यासारखे नाही.

२. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री पुराचे पाणी घरात घुसले आणि सकाळी तुम्हाला ते पुस्तक मिळाले, मग ते पुस्तक नेमके कधी घराबाहेर आले? अंदाजे किती वेळ पाण्यात होते हे सांगता येईल का?

उत्तर: नाही, रात्रीच्या अंधारात साधारण १२ च्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने पिडीत कुटुंबीय स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर नेमकं कधी काय झालं, भगवद्गीता कधी वाहत बाहेर गेली हे सांगता येणे शक्य नाही.

हे उत्तर जर खरे असेल तर मग व्हायरल व्हिडीओमध्ये भगवद्गीता ५ फूट पाण्यात फिरत राहिली, रात्रभर सतत पाण्यात खाली वर होत राहिली असे दावे त्यांनी कशाच्या आधारे केले? ते पाहण्यासाठी कोण उपलब्ध होते? हे कळायला काही मार्ग नाही.

३. व्हायरल व्हिडीओत असे दिसतेय की नदीचा प्रवाह सरळसोट आहे आणि पुस्तक तरंगत असलेली जागा काहीशी बाजूला आहे. वजनाने हलके असल्याने तिथे त्या खड्यातच भोवऱ्याप्रमाणे ते पुस्तक फिरत राहिले असावे का? किंवा झाडाझुडपांमुळे अडून राहिले असेल का?

उत्तर: शक्यता नाकारता येत नाही, कारण आम्ही त्या ठिकाणी सर्व साहित्य गोळा करण्यासाठी थेट सकाळीच गेलो होतो त्यामुळे नेमकं काय झालं असेल ते नाही सांगता येत. मात्र हे खरे की त्या शेतकऱ्याची जनावरे, पक्षी वाहून गेले. परंतु हे एवढे पुस्तकच कसे राहिले या प्रश्नाचं आम्हाला गूढ वाटतं म्हणून आम्ही त्याला दैवी चमत्काराच्या दृष्टीने पाहत आहोत.

४. जर खरेच हा दैवी चमत्कार असेल तर देवास सजीव कोंबड्या, बकऱ्या, बदके यांच्या प्राणापेक्षा पुस्तकाला तारणे महत्वाचे वाटले असावे असे वाटते का?

उत्तर: खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. मी स्वतः शिक्षक आहे. सुशिक्षित आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतलंय त्यामुळे लगेचच अशा गोष्टींवर मी पण विश्वास ठेवत नाही परंतु ते पुस्तक कसे वाहून गेले नाही या एवढ्या एका गोष्टीमुळेच मला जरा अध्यात्मिक विचार येतायेत, बाकी काही नाही.

आता थोडे हे देखील समजून घ्या

  • ‘भगवद्गीता- जशी आहे तशी’ असे लिहिलेले कव्हर आणि त्यावरील अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावरच समजते की ही कृष्णकृपामूर्ती श्री.ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद या ‘इस्कॉन’च्या संस्थापकांनी प्रकाशित केलेली आवृत्ती आहे.
  • या पुस्तकाच्या ‘हार्डकवर’ आणि ‘पेपर बॅक’ अशा दोन्ही प्रकारच्या बाईंडिंग उपलब्ध आहेत. ऍमेझॉनवरील माहितीनुसार ‘पेपर बॅक’चे वजन १३५ ग्राम आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे पुस्तक ‘पेपर बॅक’च आहे. एवढ्या हलक्या वजनाची वस्तू कुठल्याही झाडा झुडपाच्या आधारे प्रवाहात तग धरू शकते.
  • बाईंडिंग जर केवळ धाग्याची किंवा स्टेपलरची नसेल आणि नव्या पद्धतीनुसार विशिष्ट प्रकारच्या ‘ग्लू’ म्हणजेच डिंकाची असेल तर त्या पुस्तकाचे आयुष्य जास्त असते, सहजासहजी पाने विलग होत नाहीत याचे दाखलेही उपलब्ध आहेत. बाईंडिंग म्हणजेच बांधणी चांगली असल्याने पाने एकमेकांना चिकटून राहिली. त्यांचा गठ्ठा तयार झाला आणि केवळ वर खाली आणि पानांच्या कडांनाच ओल लागली,असे होऊ शकते की नाही याचा प्रयोग आपण घरी सुद्धा करून बघू शकता.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही वस्तू पाण्यावर तरंगते ती त्या वस्तूच्या घनतेमुळे. ज्या कुठल्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असेल ती वस्तू पाण्यावर तरंगते. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर जड वस्तू पाण्यात बुडते आणि हलकी वस्तू पाण्यावर तरंगते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील भगवद्गीताच काय तर त्याठिकाणी इतर कुठलेही पुस्तक असते, ज्याची घनता पाण्यापेक्षा कमी असेल ते पाण्यावर तरंगेलच. त्यामुळे जोपर्यंत ती वस्तू पाण्यात बुडत नाही, तोपर्यंत ती पूर्णपणे भिजण्याचा प्रश्नच नाही.
  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदीप गोवळकर यांनी अशाचप्रकारच्या एका पुस्तकास पाण्यात टाकून घरगुती प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण ‘सवाल अँड जवाब’ या ब्लॉगवर पाहू शकता.
  • ‘दैवी चमत्कारा’च्या नावाखाली तार्किक बुद्धीला बाजूला सारणे म्हणजेच स्वतःची दिशाभूल करून घेण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांवर चटकन अंधपणे विश्वास न ठेवता त्यातील प्रत्येक बाबीस प्रतिप्रश्न करणारा बुद्धिप्रामाण्यवाद स्वतःमध्ये जागृत ठेवायला हवा.

हेही वाचा- कृष्णाच्या पायाला स्पर्श होताच वाटीतील पाणी गळून कसे जाते? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा