Press "Enter" to skip to content

होंडा कंपनी फ्रीमध्ये ऍक्टिवा वाटतेय असा मेसेज तुम्हाला आलाय? मग हे नक्की वाचा

‘होंडा कंपनी ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त ३७२ ऍक्टिवा 5G फ्री मध्ये वाटत आहे. त्वरा करा, तुमची गाडी पटकन ताब्यात घ्या.’ आणि पुढे काहीतरी लिंक.

Advertisement

अशा प्रकारचे मेसेज सतत फिरत असतात. कधी ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त, कधी दिवाळीनिमित्त तर कधी नववर्षासाठी.

Honda freely distributing activa scooters viral massage
Credit: whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यासाठी दिवसाच्या तीन वेगवेगळ्या वेळांमध्ये स्वतः लिंकवर क्लिक करून आपली निरीक्षणं नोंदवली आहेत.

वेबसाईट:

जेव्हा असा काही मेसेज येतो तेव्हा सर्वात आधी त्यात दिलेल्या लिंककडे व्यवस्थित बघून घ्या. जसे की या मेसेजमध्ये असणारी लिंक काहीतरी विचित्र वेबसाईट दाखवत आहे.

‘Hnd-scr11sanv.bigd.xyz’

लिंक बघूनच शंका येते की होंडा सारख्या नामांकित कंपनीची वेबसाईट अशी ‘डॉट XYZ’ असणारी कशी असू शकेल?

होंडाची अधिकृत वेबसाईट www.honda2wheelersindia.com/ अशी आहे.या वेबसाईटची ती लिंक नाही म्हणजेच ती अनधिकृत आहे.

Original Honda website
होंडाची अधिकृत वेबसाईट

कधीही पहा २६५:

तरीही उत्सुकता म्हणून जर त्या लिंकवर आपण क्लिक केलं तर हे असं पेज ओपन होतं. ज्यावर वेगवेगळ्या रंगाच्या ऍक्टिवा दिसू लागतात. त्या रांगेतल्या गाड्यांवर ‘Remaining Scooters : 265’ असं लिहिलेलं दिसेल. म्हणजे त्या ३७२ पैकी २६५च शिल्लक राहिल्या आहेत असं त्यात सांगितलं जाईल.

Fake website
फेक वेबसाईट

पण आश्चर्य म्हणजे तुम्ही दोन तासांनी, दोन दिवसांनी किंवा अगदी दोन महिन्यांनी जरी ही लिंक क्लिक करून पाहिली तरीही शिल्लक राहिलेल्या गाड्या २६५च दिसतील.

साधी गोष्ट आहे, मेसेज एवढा व्हायरल झालाय म्हणजे किमान दर एका तासाला/ एका दिवसाला एक गाडी तरी कमी व्हायला हवी ना? पण ते तसं कधीच होत नाही. हा २६५ आकडा वर्षाच्या ३६५ दिवस तसाच राहु शकतो.

वेबसाईटची एंगेजमेंट वाढवण्यासाठी प्रश्न:

कुठल्याही वेबसाईटवर आपण किती वेळ घालवतो यावर त्या साईटची आर्थिक गणितं अवलंबून असतात. म्हणूनच व्हिजीटरला गुंतवून ठेवण्यासाठी काहीतरी बाष्कळ प्रश्न विचारले जातात.

या प्रश्नांची काहीही उत्तरं दिली, अगदी ‘तुम्हाला ऍक्टिवा स्कूटर आवडते का?’ या प्रश्नाला नाही उत्तर दिलं तरीही आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोच.

हे प्रश्न झाले की आपल्यासमोर नवी माहिती येते ज्यात काही स्टेप्स फॉलो करा म्हणून सांगितलं जातं. यात सर्वात पहिली स्टेप असते की तुम्हाला जसा मेसेज आलाय तसा मेसेज तुमच्या व्हॉट्सऍपवरील २० लोकांना किंवा ग्रुप्सवर पाठवा.

जर आपण थोडे संशयी असू तर लगेच शेअर करायला सुरुवात करणार नाहीत. म्हणून मग हे पेज वर स्क्रोल करू तर खाली काही कमेंट दिसतात. ज्यात वेगवेगळ्या लोकांना गाडी मिळाल्याचं वाचनात येईल. त्या प्रत्येक कमेंट समोर कमेंट किती वेळापूर्वी केल्या आहेत याच्या वेळा दिलेल्या असतील. या वेळा सुद्धा अशाच आहेत, ज्या कधीही पाहिल्या तरी तशाच राहतात. त्यात असणाऱ्या नावांवर क्लिक केलं तरीही आपण त्यांच्या प्रोफाईल पाहू शकणार नाहीत. या कमेंट आपल्याला ते २० मेसेज पाठवावेत म्हणून जणू प्रोत्साहन देण्यासाठी असतात.

शेवटी मेसेज २० जणांना पाठवण्याचा निर्णय घेतलाच आणि WhatsApp लिहिलेल्या बटनावर क्लिक केलं तर आपण थेट आपल्या whatsapp मध्ये दाखल होतो. मग आपण २० लोकांना सिलेक्ट करतो आणि एकदाच सर्वांना मेसेज सेंड करून देतो.

पुन्हा या वेबसाईटवर येऊन त्यांनी सांगितल्या प्रमाणे continue वर क्लिक केलं तर त्यावर सांगितलं जातं की आताशी तुम्ही एकाच व्यक्तीला मेसेज पाठवलाय २० पूर्ण करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांना ते whatsapp लिहिलेलं बटण २० वेळा क्लिक करून व्हायला हवंय.

आपण पुन्हा एक-एकवेळा एका व्यक्तीला तो मेसेज करून २० आकडा पूर्ण करून येतो आणि आता Continue बटणावर क्लिक करायचं असतं मग आपल्या घरी २ दिवसांनी गाडी पोहचेल अशी आपली अपेक्षा असते. म्हणून आपण पुन्हा त्या साईटवर येतो पण त्यावेळी ते बटण गायब झालेलं असतं आणि पेज रीडायरेक्ट होऊन भलत्याच वेब पेजेसवर आपण पोहचत राहतो.

अशा पद्धतीने आपल्या हातून तो खोटा मेसेज २० पेक्षा जास्त लोकांपर्यंत व्हायरल होतो आणि आपल्या किंवा कुणाच्याच घरी त्या ३७२ पैकी एकही होंडा  ऍक्टिवा 5G पोहचत नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्येच सर्व गोष्टी समजून गेल्या असल्या तरीही एकदा थोडक्यात वस्तुस्थिती अशी की व्हायरल मेसेज मध्ये दिलेली लिंक एकदा निरखून पारखून ती अधिकृत वेबसाईट सोबत पडताळून पाहिल्या शिवाय त्यावर क्लिक न करण्यातच शहाणपण आहे.

नाहीतर आपण नकळतपणे फेक मेसेज व्हायरल करणारे एक एजंट होऊन बसतो. अशा फेक व्हायरल्सला ‘चेकपोस्ट मराठी’ नेहमीच अडवत राहणार.

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा