कोरोना विषाणू भारतात दाखल झाल्यापासून आपल्याकडे उपचारांचे नानाविध पर्याय कुठूनही समोर येत असतात. तसेच नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर्सच्या नावानेही काही उपाय व्हायरल होताहेत. यात घरगुती केवळ आयुर्वेदिकच नव्हे तर अलोपथीक आणि होमिओपॅथिक मेडिसिन सुद्धा घेण्याचा सल्ला दिला गेलाय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्या आधी तो कुठे कुठे कशा कशा स्वरुपात व्हायरल होतोय हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आले की एकच मेसेज वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटल्समधील डॉक्टर्सच्या नावे सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
के.ई.एम हॉस्पिटल:
वाय.सी.एम हॉस्पिटल:
हा असा विविध हॉस्पिटलचे, वेगवेगळ्या डॉक्टरांचे दाखले देत एकच मेसेज फिरतोय, त्याच्यातील दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी सुरुवात केली तेव्हा आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रकाश कोयाडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर दिलेले स्पष्टीकरण सापडले.
यामध्ये त्यांनी व्हायरल मेसेजसोबत त्यांचा किंवा वाय.सी.एम मधील इतर कुणा डॉक्टरचा काहीही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर या मेसेज मधील दाव्यांना सुद्धा त्यांनी निराधार ठरवले आहे.
यामध्ये ते असं म्हणतायेत की “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणताही डॉक्टर असं सोशल मीडियावर औषधांची ब्रॅण्ड नावं लिहीत नाही. ज्या अर्सेनिक अल्बम चा मी स्वतः विरोध करतो ते ‘घ्या’ असं कसं सांगणार आहे. HCQ टॅब्लेट रूग्णाला देणं आता बंद झाले आहे. अद्रकवाली चहा, हळदीचे दूध... वगैरे तर भयंकर प्रकरण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या कोरोनासंदर्भातील प्रत्येक पोस्टखाली माझे नाव लिहीतो.
या फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज मध्ये फक्त ‘वाय. सी. एम. रुग्णालयातील नामांकित डॉक्टर’ असं लिहिलं आहे. एकूण काय तर हा मेसेज चुकीचा आहे, त्यातील माहिती चुकीची आहे. मीच नाही तर YCM च्या कोणाही डॉक्टरने असा मेसेज लिहीलेला नाही.
१२ मार्च पासून मी सातत्याने कोरोनावर लिहीतोय. साधारणपणे पंधरा, वीस पोस्ट झाल्या असतील.
फॉरवर्ड करणाऱ्यांनी सत्यता पडताळूनच तो पुढे पाठवावा. -डॉ. प्रकाश कोयाडे”
वस्तुस्थिती:
व्हायरल मेसेज त्या डॉक्टर्सना माहित न होता परस्पर त्यांच्या दाखल्याने फिरत आहेत. त्यातील दावे निराधार आणि घातक आहेत.
‘चेकपोस्ट मराठी‘ने कोरोनाविषक उपाय म्हणून समोर आलेल्या अनेक दाव्यांची पडताळणी करून त्यांना पुराव्यानिशी खोडून काढले आहे. त्यामध्ये ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ या होमिओपॅथिक औषधाने कोरोना बरा होतो हे सांगणाऱ्या दाव्यांनाही मोडीत काढले आहे. या व्यतिरिक्त आयुर्वेदिक म्हणून ज्या काही गोष्टी, घरगुती उपाय सांगितले जात आहेत त्यांचीही शहानिशा केलेली आहे. ते आपण ‘येथे‘ वाचू शकता.
मास्कचा वापर, वीस सेकंद साबणाने हात धुणे, गरज असेल तिथे सॅनिटायझर वापरणे, सकस जेवण आणि पुरेसा व्यायाम हेच सध्या तरी प्रभावी प्रतिबंधक उपाय आहेत. इतर काही त्रास जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला फायद्याचा. कोरोनावरील कुठल्याही शंकेसाठी जागतिक आरोग्य संघटनेची वेबसाईट बघणे देखील श्रेयस्कर.
तरीही असे काही व्हायरल मेसेज आपणास येत असतील तर त्यांची सत्यता पडताळण्यासाठी आपण ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘९१७२०११४८०’या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधू शकता.
हेही वाचा: आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या होमिओपॅथीक ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ गोळ्या कोरोनावरचा रामबाण उपाय आहे का?
[…] […]