सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओत मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत असताना दिसत आहे. दावा केला जातोय की कॅनडामधील चक्रीवादळाचा (canada cyclone) हा व्हिडीओ असून ‘चायना जिओग्राफिक’ मासिकाने तो तब्बल 10 लाख डॉलर्स म्हणजे साधारण 7 कोटी 45 लाख 18 हजार रुपयांना विकत घेतला आहे.
“या चक्रीवादळामुळे कॅनडाच्या टोरोंटोमधील विमानतळावरही लँडफॉल झाला. भयानक! चायना नॅशनल जिओग्राफिक मासिकाने हा व्हिडिओ 1 दशलक्ष डॉलर्सवर विकत घेतला आहे, तो पाहण्याची संधी गमावू नका! व्हिडिओ कालावधी: 4 मिनिटे 10 सेकंद” या अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
व्हॉट्सअपवर देखील हा व्हिडीओ अनेक जणांकडून फॉरवर्ड केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन आम्ही त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला डीव्हीडीझीच्या वेबसाईटवर या व्हिडीओ विषयीची माहिती मिळाली.
वेसाईटवरील माहितीनुसार व्हिडिओतील दृश्ये ‘Into the Storm’ या हॉलिवूडपटातील आहेत. रिचर्ड आर्मिटेज (Richard Armitage) आणि सारा वेन कॅलिस (Sarah Wayne Callies) यांच्या प्रमुख भूमिका असलेला स्टीव्ह क्वेल (Steve Quayle) यांनी दिग्दर्शित केलेला ‘Into the Storm’ हा चित्रपट ८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. ‘वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली होती.
अमेरिकेतील कोलोरॅडोमधील सिल्वरटन (Silverton) नावाच्या शहरात अचानक आलेल्या वादळामुळे कशा प्रकारे विध्वंस झाला, याचे चित्रण या चित्रपटात बघायला मिळते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ याच चित्रपटातील दृश्यांचा आहे. चित्रपटाचा प्रोमो आपण ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर बघू शकता.
दरम्यान, कॅनडातील सस्काचेवान प्रांतात नुकतीच टॉर्नेडोने धडक दिली. याबद्दलचा व्हिडिओ आपण खाली बघू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील कॅनडातील चक्रीवादळाचा (canada cyclone) म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ खऱ्याखुऱ्या चक्रीवादळाचा नसून ‘Into the Storm’ या हॉलिवूडपटातील आहे. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा- अवकाशातून पृथ्वीवर उडी मारणारा ऑस्ट्रेलियन अंतराळवीर नाही, वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
Be First to Comment