भारतात सर्वात जास्त आवडीने पाहिला आणि खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु ‘हॉकी’ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे (hockey national game) असे आपण कैक ठिकाणी ऐकत वाचत आलोय. याच संदर्भात एक ‘माहिती अधिकारात’ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. दावा केला जातोय की ‘हॉकी’ भारताचा राष्ट्रीय खेळ नाही.
‘RTI माहितीचा अधिकार’ नावाच्या फेसबुक ग्रुपवर कामेश घाडी नामक सदस्याने ‘देशाचा राष्ट्रीय खेळ आजपर्यंत घोषित करण्यात आला नाही, विलास शिंदे यांनी माहिती अधिकारत मागितलेल्या अर्जाला भारत सरकारचे उत्तर…..’ या कॅप्शनसह एक माहिती अधिकाराचे उत्तर असलेल्या पत्रकाचा फोटो जोडून शेअर केले आहे.
‘चेकपोस्ट मरठी’चे वाचक ‘उमेश परब’ यांनी याच पोस्टची लिंक आमच्याशी शेअर करत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याविषयी पडताळणी करण्यासाठी ऍडव्हान्स कीवर्ड्सच्या सहाय्याने गुगल सर्च केले. त्यामध्ये विविध राष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या आम्हाला सापडल्या.
‘हॉकी’ला भारताचा राष्ट्रीय खेळ (hockey national game) म्हणून नेमके केव्हा घोषित केले हे विचारणारा ‘माहितीच्या अधिकारातील’ हा व्हायरल अर्ज एकमेव नाही. हा आताचा व्हायरल अर्ज श्री विलास प्रतापराव शिंदे यांच्या नावाचा आहे. त्यासाठीचे उत्तर १७ जुलै २०२० रोजी मिळाले आहे. परंतु या आधी असे दोन अर्ज दाखल झाले होते.
१३ फेब्रुवारी २०२० रोजी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार धुळ्यातील सिंदखेडा येथे मयुरेश अग्रवाल या खेळाच्या शिक्षकाने ‘ केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाकडे’ माहितीच्या अधिकारात सदर प्रश्न विचारला होता. त्यावेळीसुद्धा हेच उत्तर आले होते की भारताने आजवर कोणत्याही खेळास अधिकृतरीत्या ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून घोषित केले नाही.
२ ऑगस्ट २०१२ रोजी ‘इंडिया टुडे’ने पब्लिश केलेल्या बातमीनुसार १० वर्षीय ऐश्वर्या पराशर नावाच्या विद्यार्थिनीने पंतप्रधान कार्यालयाला याविषयी माहिती मागितली होती. त्यातही याच पद्धतीचे उत्तर देण्यात आले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल दावा सत्य आहे. ज्या ज्या वेळी केंद्र सरकारकडे माहितीच्या अधिकारात ‘हॉकी’ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का यासंबंधी विचारणा करण्यात आली, त्या प्रत्येक वेळी हेच उत्तर आले आहे की भारताने कुठल्याच खेळास ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून घोषित केलेले नाही.
हेही वाचा: सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांची शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कारवापसी?
10 वी व 12 वी चे marksheet व गुणपत्रक हरविले असेल तर कसे परत मिळवावे ?