Press "Enter" to skip to content

राहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार!

‘पिगॅसस’ हेरगिरी प्रकरणात सरकारकडून भाजपच्या दिग्गज नेत्यांना सरकारच्या बचावात मैदानात उतरविण्यात येत असल्याचं बघायला मिळतंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खिल्ली उडवली आहे. ‘आलू पासून सोनं बनवणाऱ्या व्यक्तीची (aaloo se sona) हेरगिरी करून आम्ही काय मिळवणार’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Advertisement

शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीची प्रतिक्रिया शेअर केलीये. ट्विटच्या कॅप्शनमध्ये शिवराज सिंह चौहान म्हणतात, “श्री राहुल गांधी जी खुद राजनीतिक रूप से शून्य हैं. आलू से सोना बनाने वाले व्यक्ति का फोन टेप करवा कर हम क्या करेंगे?”

अर्काइव्ह

पडताळणी:

शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘आलू से सोना बनाने वाले व्यक्ति’ असा केलाय. भाजप नेत्यांकडून अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी याच वक्तव्याचा आधार घेतला जातो.

राहुल गांधींचे हे ‘आलू-सोना’ वक्तव्य आहे १३ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या गुजरातमधील पाटण येथील सभेतील भाषणातले. या भाषणात राहुल गांधींनी ‘आलू से सोना बनाऊंगा’ (aaloo se sona)अशा आशयाचे विधान केले होते, मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भाने. राहुल गांधींचं मूळ वक्तव्य असं होतं की,

“आलू के किसानों को कहा, ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा. इस साइड से आलू डालो, उस साइड से सोना निकालो. इतना पैसा बनेगा आप को पता नहीं होगा क्या करना है पैंसों का. मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदीजी के शब्द है”

राहुल गांधींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून पाटण येथील सभेतील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. साधारणतः २६ मिनिटांच्या भाषणातील १७ मिनिटे ५२ सेकंदाच्या पुढे आपण हे ऐकू शकता.

राहुल गांधींच्या मूळ भाषणाशी छेडछाड करून त्यांनी ‘आलू से सोना बनाऊंगा’ असे वक्तव्य केल्याचा फेक दावा पसरविण्याचे श्रेय जाते सोशल मिडीयावरून फेक न्यूज पसरविण्यासाठी कुख्यात असणाऱ्या भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांना.

राहुल गांधींच्या पाटण येथील भाषणानंतर दोनच दिवसांनी मालवीय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांच्या भाषणामधील आलू-सोना संबंधीच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला. यातलं “मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदीजी के शब्द है” हे वाक्य व्हिडिओतून वगळण्यात आलं.

व्हिडीओ शेअर करताना अमित मालवीय म्हणतात, “हा व्हिडीओ पाठवून लोक अविश्वासाने मला विचारताहेत की त्यांनी खरंच असं म्हंटलं का? हो. त्यांनी म्हंटलंय”

अर्काइव्ह

मालवीय यांनी सकाळी पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल करण्यात योगदान दिलं ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी. पात्रांनी त्याच दिवशी दुपारी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात,

“इस side से आलू. उस side से सोना. अब बताओ भारतवासियों, हँसना है या रोना”

अर्काइव्ह

पात्रा यांचं हे ट्विट ५००० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलं होतं. अनेक फॅक्ट चेकर्सकडून त्याचं फॅक्ट चेक देखील केलं गेलं होतं. मात्र तरीदेखील दोघांपैकी कुणाकडूनही आपली पोस्ट डिलीट केली गेलेली नाहीये. दोघांच्याही ट्विटर अकाउंटवर हे ट्विट अजून देखील उपलब्ध आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पिगॅसस प्रकरणाच्या संदर्भाने काँग्रेस नेते राहुल गांधींचा केलेला ‘आलू से सोना बनाने वाले व्यक्ति’ हा उल्लेख एडिटेड क्लिपमधील दाव्याच्या आधारे करण्यात आलेला आहे.

राहुल गांधींनी ‘आलू से सोना बनाऊंगा’ असा दावा केलेला नव्हता. पंतप्रधान मोदींनी आलू उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारचे आश्वासन दिल्याचं ते सांगत होते. म्हणजेच राहुल गांधींनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भाने केले होते.

हेही वाचा- राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा