Press "Enter" to skip to content

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांची शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कारवापसी?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज देशभरात बंदचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटीज आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करताहेत. अनेक खेळाडूंनी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करण्याची घोषणा देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक ग्राफिक प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. दावा करण्यात येतोय की सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Source: Facebook

आर. ग्याना या युजरकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेलं हे ग्राफिक ७०३ युजर्सकडून शेअर करण्यात आलंय. इतरही अनेक युजर्स हे ग्राफिक मोठ्या प्रमाणात शेअर करताहेत.

पडताळणी:

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ऍथलिट खेळाडूंनी आपापले पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आपण खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा बॉक्सर विजेंदर सिंगने नुकतीच केली आहे.

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव ही जागतिक क्रिकेटमधील दिग्गज नावं आहेत. त्यांच्यापैकी कुणीही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात अशी कुठलीही भूमिका घेतली असती तरी, त्याची मोठी बातमी झाली असती. मात्र कुठल्याही न्यूज चॅनेलवर किंवा न्यूज पेपरमध्ये आम्हाला यासंबंधीची बातमी वाचायला मिळाली नाही.

त्यानंतर आम्ही सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल्सना भेट दिली. आम्ही दोन्ही अकाऊंटसवरून गेल्या आठवड्याभरात करण्यात आलेल्या पोस्ट बघितल्या. मात्र कुठेही अशा प्रकारची माहिती मिळाली नाही. सुनील गावस्कर हे ट्विटरवर सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी काही माहिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यापैकी कुणीही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार परत केले असल्याच्या दाव्याचा खरेपणा पटवणारी कुठलीही माहिती कुठल्याही विश्वासार्ह ठिकाणाहून मिळाली नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार परत करण्याची घोषणा केली असल्याचा कुठलाही पुरावा आम्हाला सापडला नाही. साहजिकच हे दावे निराधार आहेत.

हे ही वाचा- आंदोलक शेतकरी रामाचा विरोध करताहेत का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा