भारत-चीन सीमेवरील तणावग्रस्त परिस्थितीत ‘थ्री इडियट्स’ मध्ये दिसलेलं गाव चीनने ताब्यात घेतलं असल्याच्या बातम्या व्हायरल होताहेत.
फेसबुकवर प्रवीण सानप यांनी ‘थ्री इडियट्स’ मधील शुटींग केलेलं तलाव चीन्यांनी बळकावले’ अशा पोस्टसह ‘द वायर’च्या बातमीची लिंक शेअर केली आहे.
याचा हा स्क्रीनशॉट ‘चेकपोस्ट मराठी’च्या एका वाचकाने पडताळणी करिता आम्हाला पाठवला आणि बातमीत किती तथ्य आहे याची विचारणा केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने वाचकांच्या विनंतीला मान देत पडताळणी सुरु केली. सर्वांत आधी आम्ही प्रवीण सानप यांनी फेसबुकवर जी पोस्ट शेअर केलीय त्यावर जाऊन बातमी व्यावस्थित वाचली.
‘द वायर’च्या बातमीत पॅनगाँग तलाव आणि त्या आसपासच्या भागाचा उल्लेख आहे. यात त्यांनी सांगितलंय की चीनने या तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर मे महिन्यातच डेरा जमवलाय आणि गस्त घालायला सुरुवात केलीय. दोन्ही सैन्यात जी चर्चा झाली यामध्ये आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही असा दावा केलाय.
‘थ्री इडियट्स’ मध्ये दाखवलेला तलाव नक्की पॅनगाँग आहे ना? हे एकदा क्रॉसचेक करणं गरजेचं होतं. म्हणून मग आम्ही गुगलला हे एकदा विचारून पाहिलं आणि खात्री झाली की होय ‘पॅनगाँग’चीच दृश्ये ‘थ्री इडियट्स’ मध्ये दाखवली आहेत.
‘पॅनगाँग’ तलाव हा लद्दाख मधला भाग आहे. साधारणतः १३० किमी लांबी आणि ५ किमी रुंदी असणाऱ्या या तलावाचा जवळपास ६० टक्के भाग चीनव्याप्त आहे. भारत-चीन मधील ‘लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल’ याच तलावातून जाते.
‘द वायर’च्या बातमीला इतर माध्यमे दुजोरा देत आहेत की नाहीत याचा तपास केला आणि NDTV, द टाईम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्स्प्रेस या वेगवेगळ्या माध्यमांच्या बातम्या समोर आल्या.
सर्व बातम्यांचा सूर साधारण एकच आहे. त्यातली त्यात द इंडियन एक्स्प्रेसची बातमी जास्त ताजी आणि अपडेटेड आहे. तिच्या हेडलाईन मध्येच बातमी कळून जाते.
‘Pangong Tso still a concern, no response from China so far’
मजकुरात काय लिहिलंय थोडक्यात वाचा:
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी सैन्याच्या प्रतिनिधींना भेटले आणि परिस्थितीची चौकशी केली. या भेटीत अशी माहिती समजली की पूर्व लडाखमध्ये चीन ने जी घुसखोरी केली आहे त्या संबंधी झालेल्या चर्चांतून लाईन ऑफ ऍक्च्यूअल कंट्रोल (LAC) वरून काही भागांत मागे सरकण्याची तयारी चीनने दर्शवली आहे. परंतु पॅनगाँग टीएसओ भागातून मागे हटायला ते तयार नाहीयेत.
द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत असंही लिहिलंय की दोन्ही सैन्यात चर्चांसाठी जी काही बातचीत झाली त्या प्रत्येकवेळी ते पॅनगाँग भागावर अडूनच आहेत.
सैन्यातील काही सोर्सेसकडून एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार ‘त्यांच्याकडून या भागातून मागे सरकण्याविषयी काहीच संकेत दिसत नाहीयेत. त्यांनी तैनात केलेले दल अधिक काळ तिथे राहतील असं दिसतय.’
बातम्यांत सांगितल्याप्रमाणे चीन ने या स्वतःच्या सोयीसाठी भागात रस्ता बनवलाय, तलावात मोटर बोटींनी गस्त चालू आहे. तलावाच्या आसपासच्या भागात विमानांच्या सुद्धा गस्ती झाल्याचं समजतय.
वस्तुस्थिती:
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे सैन्यासोबत झालेले बोलणे, बातम्यांना सैन्यातील सोर्सेसकडून मिळालेली माहिती या सर्व गोष्टींवरून तरी हेच समजतय की पॅनगाँग तलाव आणि जवळपासच्या भूभागावर चीनी सैन्याने डेरा टाकलाय आणि तेथून ते मागे सरकण्याचे नावही घेत नाहीयेत.
याचाच अर्थ असा की दाव्यात सांगितल्या प्रमाणे ‘थ्री इडियट्स’ मध्ये दिसलेलं तलाव चायनाने बळकावलं हे खरंय. जर चर्चा सफल झाल्या आणि चीनने तयारी दर्शवली तर कदाचित ते मागे हटतील नाहीतर भारतीय सैन्य यावर काय पाउल उचलेल हे पहावं लागेल तोवर तरी ‘थ्री इडियट्स’ मधला तलाव कायमचा चिन्यांच्या ताब्यात गेला वगैरे म्हणणं थोडं घाईचं ठरेल.
Be First to Comment