काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Mandir) ते गंगा नदीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) आदेशाने रस्त्यात येणारी ८० मुस्लीम घरे विकत घेतली गेली. जेंव्हा ही घरे जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा त्यात ४५ पुरातन हिंदू मंदिरे आढळून आली. अशा प्रकारच्या डाव्यांसह काही फोटो-व्हिडीओज सोशलमीडियात व्हायरल होत आहेत.
व्हायरल दावा:
*काशी विश्वनाथ मन्दिर ते गंगा नदी पर्यन्त रस्त्याची रुंदी वाढवण्याकरिता मोदिनी रस्त्यात येणारी ८० मुस्लिमांची घरे विकत घेण्यास सुरुवात केली. जेंव्हा ही घरे जमीनदोस्त करण्यात आली तेंव्हा त्यात ४५ जूनी मंदिरे आढळून आली.**जेव्हा औरंगजेबाने मूळ काशी विश्वनाथ मंदिराचे ज्ञानवपी मस्जिदित रूपांतर केले तेव्हा त्यांनी त्याच्या काही सैनिकांना मशिदीच्या आजूबाजूला राहण्यास जागा दिली व ही आजूबाजूची छोटी मंदिरे कब्जात घेऊन त्यांची घरे या मंदिरांच्या वर बांधली.**आत्ता पंतप्रधान मोदींनी ही सर्व मुघल सैन्याची वारसा असलेली अतिक्रमित घरे हटविली आहेत आणि आणि पहा यात कोणते जग आढळून आले आहे. ४५ पुरातन मंदिरांचा खजिना.
फेसबुक-व्हॉट्सऍपवर हे दावे आता मराठी भाषेत व्हायरल होत असले तरीही हिंदी इंग्रजीमध्ये 2019 पासूनच व्हायरल होत आहेत. 18 जून 2019 रोजी ‘RSS राष्ट्रीय स्वयंसेव संघ’ या फेसबुक पेजवर हेच दावे पोस्ट करण्यात आले होते.
२०१९ नंतर सातत्याने सोशल मीडियामध्ये हे दावे फिरताना आढळतात.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीसाठी काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता विविध बातम्या आम्हाला मिळाल्या. ‘बीबीसी‘च्या बातमीनुसार काशी विश्वनाथ मन्दिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी शासनाद्वारे ‘काशी विश्वनाथ विशिष्ट क्षेत्र विकास परिषद’चे गठन केले आहे. या परिषदेचे मुख्य कार्यपालक म्हणून विशाल सिंह कार्यरत आहेत. त्यांच्याकडे व्हायरल दाव्यांविषयी विचारणा केली असता त्यांनी सदर दावे फेक असल्याचे बीबीसीला सांगितले.
‘ सदर योजनेसाठी एकूण 249 घरे ताब्यात घेतली आहेत. यापैकी एकही घर मुस्लीम धर्मीय व्यक्तीचे नाही, ही सर्व घरे हिंदू धर्मीय लोकांचीच आहेत. आतापर्यंत ताब्यात घेतलेली 183 घरे तोडली आहेत, त्यांमध्ये छोटी-मोठी मिळून एकूण 23 मंदिरे आम्हाला सापडली. ‘
-विशाल सिंह, मुख्य कार्यपालक-काशी विश्वनाथ विशिष्ट क्षेत्र विकास परिषद
परिषदेच्या वेबसाईटवर ताब्यात घेतलेल्या घरमालकांच्या नावांची यादी उपलब्ध आहे. ही यादी देखील आम्ही पडताळून पाहिली असता त्यात एकही मुस्लीम नाव असल्याचे आढळले नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ-फोटो खरे असले तरीही त्यासोबत असणारे दावे फेक आहेत. काशी विश्वनाथ मंदिर ते गंगा घाट रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या घरांपैकी एकही घर मुस्लीम व्यक्तीचे नाही. हिंदूंच्याच घरात हिंदू मंदिरे आढळली आहेत.
हेही वाचा: इंडोनेशियात समुद्राच्या आत सापडले ५००० वर्षांपूर्वीचे विष्णू मंदिर? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]