उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे शहरांची नावे बदलण्यासाठी ख्यातकीर्त आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक शहरांची नावे बदलली आहेत. सध्या दावा केला जातोय की आता आदित्यनाथ यांनी ‘गाझियाबाद’चे (Ghaziabad) नाव बदलले असून शहराला ‘एकलव्य पूर’ असे नवीन नाव दिले जाणार आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील असणारे भाजपचे नेते एन. रामचंद्र राव (N Rmachandra Rao) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलंय. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,
“सनातनी आप सभी के लिए खुशखबरी. योगी जी “गाजियाबाद” का नाम बदलकर “एकलव्य पुर” रखे जाने की तैयारी। हमारे यूपी के महंत योगी आदित्यनाथ जी मुगलों की हर निशानी मिटाने को तैयार हैं..!!
फेसबुकवर देखील अशाच प्रकारचे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.
पडताळणी:
- गाझियाबाद (Ghaziabad) हे उत्तर प्रदेशातील महत्वाच्या शहरांपैकी एक आहे. शहराचे नाव बदलण्यात आले असते तर तो निश्चितच राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातमीचा विषय ठरला असता. मात्र आम्ही ज्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने असा काही निर्णय घेतला आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यासंदर्भातील कुठलीही बातमी आम्हाला सापडली नाही.
- पडताळणी दरम्यान आम्हाला ‘दै. जनसत्ता’च्या वेबसाईटवर ६ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित बातमी मात्र मिळाली. या बातमीनुसार भाजपचे राज्यसभा खासदार अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून गाझियाबादचे नाव बदलून महाराज अग्रसेन नगर करावे, अशी मागणी केली होती.
- गाझियाबादमध्ये मोठ्या प्रमाणात वैश्य समाजाचे लोक राहतात. त्यांची अनेक वर्षांपासून गाझियाबादचे नामकरण महाराज अग्रसेन नगर करण्याची मागणी आहे. गाझियाबाद मुघल राज्यकर्त्या गाजीउद्दीनने वसवले होते, पण तो एक शासक होता. मात्र गाझियाबादच्या विकासात वैश्य समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे समाजाच्या या मागणीचा विचार करून गाझियाबादच्या नावात बदल करण्यात यावा, असे अग्रवाल यांनी म्हंटले होते.
- अग्रवाल यांच्या मागणीवर अद्यापपर्यंत तरी कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेश सरकारच्या वेबसाईटवर देखील शहराचा ‘गाझियाबाद’ असाच उल्लेख बघायला मिळतोय.
- उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ मणि त्रिपाठी (Shalabh Mani Tripathi) यांनी देखील असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘गाझियाबाद’चे नाव बदलून ‘एकलव्यपूर’ केले असल्याचा व्हायरल दावा चुकीचा आहे.
हेही वाचा- मुंबईतील पेट्रोल पंपाने बिलावर मोदींना पुन्हा मतदान न करण्याचे आवाहन केले आहे का?
Be First to Comment