सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भातला एक जुनाच दावा नव्याने व्हायरल होतोय. राहुल गांधी यांचे एका युवतीसोबतचे दोन फोटो शेअर करताना दावा केला जातोय की विकिलिक्सने राहुल गांधी विवाहित असल्याचा दावा (wikileaks rahul gandhi marriage) केलाय.
व्हायरल दाव्यात राहुल गांधी यांचा उल्लेख राउल विंची असा करण्यात आलाय. राहुल गांधी पहिल्यापासूनच विवाहित असून त्यांना २ मुलं आहेत. मुलाचं नाव नियाक असं आहे, तर मुलीचं नाव माईनक आहे.
राहुल गांधींची दोन्हीही मुलं लंडनमध्ये वास्तव्यास असून त्यांची पत्नी कोलंबियन आहे. आपण अविवाहित असल्याचं सांगून राहुल गांधी देशाला फसवत असल्याचं देखील व्हायरल दाव्यात सांगण्यात आलंय.
राहुल गांधींचे हेच फोटो कॉपी पेस्ट दाव्यासह फेसबुकवर देखील फिरताहेत.
पडताळणी:
राहुल गांधी यांच्या विवाहित असण्या किंवा नसण्यासंदर्भात जर विकिलिक्सने काही खुलासा केला असता (wikileaks rahul gandhi marriage) तर सहाजिकच ती एक मोठी बातमी ठरली असती. देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील या बातमीची दखल घेतली असती. परंतु आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी वाचायला अगर बघायला मिळाली नाही.
फोटो नेमका कुठला आणि फोटोत राहुल गांधी यांच्यासह दिसणारी युवती नेमकी कोण हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला व्हायरल फोटोतील युवतीनेच सप्टेंबर २०१७ मध्ये आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून राहुल गांधी यांच्या सोबतचा फोटो अपडेट केला असल्याचे आढळून आले. त्यानुसार व्हायरल फोटोतील युवतीचे नाव ‘नथालिया रामोस’ आहे.
‘नथालिया रामोस’ यांचं ट्विटर अकाउंट ‘ब्लू टीक व्हेरीफाईड’ आहे. त्यांच्या ट्विटर बायोनुसार त्या अभिनेत्री आणि लेखिका आहेत. गुगल किवर्डच्या मदतीने अधिक शोध घेतला असता ‘झी २४ तास’च्या वेबसाईटवर नथालीया रामोस यांनी राहुल गांधी यांच्यासह पोस्ट केलेल्या फोटोसंदर्भातील बातमी वाचायला मिळाली. बातमीनुसार नथालिया रामोस या स्पॅनिश अभिनेत्री असून त्यांची आई ऑस्ट्रेलियन आहे तर वडील कार्लोस रामोस हे स्पॅनिश पॉप गायक आहेत. नथालिया सध्या अमेरिकेत राहतात.
‘लोकमत’च्या बातमीनुसार नथालिया २००५ पासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. २००७ सालच्या ‘ब्रेटज’ चित्रपटापासून त्यांना ओळख मिळाली. स्पेनच्या माद्रिदमध्ये जन्मलेल्या नथालिया यांचं शिक्षण ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न आणि नंतर मियामीमध्ये झालं असून २०१६ सालापासून त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.
नथालिया या राजकीय-सामाजिक विषयांवर सातत्याने आपली भूमिका मांडत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून ते अगदी सहज लक्षात येतं. त्यांनी आपली पदवी देखील राज्यशास्त्रामध्येच पूर्ण केलेली आहे.
राहुल गांधी आणि नथालिया रामोस यांचा फोटो नेमका कुठे घेण्यात आला हे शोधलं असता असं समजलं की राहुल गांधी यांना लॉस एंजेलिसच्या बर्ग्रुएन इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आलं होतं. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील युट्युबवर उपलब्ध आहे.
कार्यक्रमाला मिलिंद देवरा आणि सॅम पित्रोदा देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर नथालिया यांनी राहुल गांधी यांच्यासह फोटो घेतला होता. हाच फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोजसोबत केले गेलेले दावे पूर्णतः चुकीचे आहेत. विकिलिक्सने राहुल गांधी यांच्या संदर्भात कुठलाही खुलासा केलेला नाही.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटोत राहुल गांधी यांच्यासह दिसणारी युवती ‘स्पॅनिश-अमेरिकन’ अभिनेत्री नथालिया रामोस असून एका राजकीय कार्यक्रमादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्यासह घेतलेला फोटो सध्या सोशल मीडियात चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.
हे ही वाचा- राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !
[…] हे ही वाचा: विकिलिक्सने राहुल गांधी विवाहित असल्… […]