सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन पोलिस एका तरुणास मारहाण करताना दिसताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असून सदर तरुण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याने पोलिसांकडून त्याला चोप देण्यात आला आहे.
‘पाकिस्तान के समर्थन में पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाने वाले युवक के साथ यूपी पुलिस लठमार होली खेलती हुई’ अशा प्रकारच्या कॅप्शनसह हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर 2 मे 2021 रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. बातमीनुसार सदर घटना उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील मथेला गावातील आहे.
मथेला गावात चोरीच्या आरोपावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या मुलांवर मोबाईल चोरीचा आरोप होता. मोबाईल दुकानदाराच्या मुलाने सदर मुलांना चोरी करताना पकडल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरी करणाऱ्या मुलांना बेदम मारहाण केली होती.
त्यानंतर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसपी अमित कुमार यांनी स्टेशन प्रभारी शिवानंद वर्मा आणि कॉन्स्टेबल दिलीप कुमारला निलंबित केले होते.
सध्या व्हिडीओ नव्याने व्हायरल व्हायला लागल्यानंतर चंदौली पोलिसांकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आली आहे. यामध्ये देखील व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असून अल्पवयीन मुलांना अमानुष वागणुक देणाऱ्या दोन पोलिसांवर त्यावेळीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे देखील या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वीचा असून व्हिडिओचा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील मथेला गावातील घटनेचा असून पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी दोन पोलिसांनी निलंबित देखील करण्यात आले होते.
हेही वाचा- शीख तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ पाकिस्तानातील नव्हे तर पंजाबमधील लुधियानाचा!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या … […]