Press "Enter" to skip to content

सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात उतरल्या यूपीएससी टॉपर श्रुती शर्मा? वाचा सत्य!

देशभरात केंद्र सरकारच्या सैन्य भरतीसंदर्भातील अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) विरोधात प्रदर्शने सुरु आहेत. बिहारमधून सुरु झालेल्या या आंदोलनाचे लोन देशातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले आहे.

Advertisement

अशातच सोशल मीडियावर कथितरित्या युपीएससी टॉपर श्रुती शर्मा (Shruti Sharma) यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल होतंय. आता आमदार-खासदारांनी देखील दोन वर्षांनी निवृत्त व्हायला हवे. तसेच त्यांच्या पेन्शन बंद केल्या जाव्यात. दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या या नेत्यांना ‘सदनवीर’ संबोधले जावे, असे श्रुती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

काही वेबपोर्टल्सने या ट्विटच्या आधारे बातम्या देखील प्रसिद्ध केल्या आहेत.

news report about Shruti Sharma tweet against agnipath scheme
Source: tirandaj

पडताळणी:

सर्वप्रथम तर श्रुती शर्मा यांनी अग्निपथ योजनेच्या संदर्भाने काही प्रतिक्रिया दिली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता स्पेशल कव्हरेज न्यूज या पोर्टलवर यासंबंधीची बातमी बघायला मिळाली.

सरकारच्या ‘अग्निपथ योजने’च्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचा, तो घटनात्मक अधिकार आहे. पण विरोधाच्या नावाखाली नावाखाली जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे शिस्तबद्ध भारतीय सैन्यात भरती होण्यास पात्र नाहीत, असे श्रुती शर्मा यांनी म्हंटल्याचे बातमीमध्ये सांगण्यात आले आहे. श्रुती शर्मा यांच्या या वक्तव्याला ‘न्यूज 18 ओडिया’च्या वेबसाईटवर देखील प्रसिद्धी देण्यात आली आहे.

व्हायरल ट्विटविषयी अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला श्रुती शर्मा यांचेच एक ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये श्रुती यांनी आपल्या नावाने अनेक फेक अकाउंट बनविण्यात आल्याविषयीची तक्रार ट्विटरकडे केली आहे. श्रुती शर्मा यांनी ट्विट केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या ट्विटचा देखील समावेश आहे. शिवाय त्यांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या इतर अनेक अकाउंटचा स्क्रिनशॉट देखील श्रुती यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की श्रुती शर्मा यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात ट्विट केलेले नाही. श्रुती यांनी आंदोलन करणे हा आंदोलकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगतानाच त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या व्हायरल होत असलेले ट्विट श्रुती यांच्या नावाने बनविण्यात आलेल्या फेक अकाऊंटवरून करण्यात आले आहे.

हेही वाचा- अमित शाह यांनी नुपूर शर्माला ‘झेड’ सुरक्षा देण्याची शिफारस केलीय? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा