संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अर्थात ‘UNESCO’ ने कर्नाटकमधील होन्नावर येथे कार्यरत असणाऱ्या दुय्यम निबंधकाच्या स्वाक्षरीस जगातील सर्वोत्तम ‘नेत्रदीपक’ स्वाक्षरी जाहीर केल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ‘ए डी चुरी‘ यांनी व्हॉट्सऍपपवर व्हायरल होत असणारे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. फेसबुकवर हेच दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करून पाहिले परंतु ‘UNESCO’ने अशा कुठल्या सहीला ‘नेत्रदीपक – Spectacular’ वगैरे संबोधल्याची एकही बातमी सापडली नाही.
त्यानंतर आम्ही जेव्हा स्वाक्षरीचा फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. ‘कोरा’ या वेबसाईटवर ‘तुमच्या पाहण्यात आलेली सर्वात भन्नाट स्वाक्षरी कुठली?’ अशा प्रश्नाच्या उत्तरात अनुप सिंह यांनी जुलै २०११ साली स्वतःच्या ‘विवाह प्रमाणपत्रावर’ असलेल्या रजिस्ट्रार ऑफिसरच्या सहीचा फोटो शेअर केलाय. हीच ती व्हायरल सही होय. यात ती सही ‘के.एस.शांतैय्या’ यांची असल्याचे समजले.
मिळालेल्या नावावरून आम्ही शोधाशोध केली असता कन्नड भाषेतील ‘वन इंडिया’ची बातमी आम्हाला सापडली. २०१८ सालातील ही बातमी आहे. यात होन्नावर येथे बदली होऊन आलेल्या ‘के.एस.शांतैय्या’ (K S Shantayya)यांच्या स्वाक्षरीची चर्चा सोशल मीडियात कशी रंगली याविषयी बातमी केलीय. त्यात त्यांनी असे सांगितले आहे की शांतैय्या यांनी स्वतः या सहीचा फोटो सोशल मीडियात टाकला. त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा रंगू लागल्या.
गंमतीत अनेकांनी ही सही रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची असायला हवी होती म्हणजे नकली नोटा तयार नसत्या झाल्या एवढी अवघड ही सही आहे असे म्हंटले आहे. ‘वन इंडिया’च्या त्या बातमीत देखील कुठेही ‘UNESCO’चा उल्लेख नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की कर्नाटकातील होन्नावर येथील ‘विवाह नोंदणी कार्यालयात’ कार्यरत असणारे ‘के एस शांतैय्या’ यांच्या अनोख्या स्वाक्षरीची चर्चा सोशल मीडियात २०१८ पासून रंगते आहे परंतु त्या स्वाक्षरीस ‘UNESCO’ने ‘नेत्रदीपक – Spectacular’ वगैरे संबोधल्याचे दावे फेक आहेत.
हेही वाचा: अमेरिकेने केला शिवरायांचा गौरव? छत्रपतींची प्रतिमा १०० डॉलरच्या नोटेवर?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment