मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा झेंड्याकडे पाठ (uddhav thackeray national flag) करून सलामी देतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.
देशाच्या स्वातंत्र्यदिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन केले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा पहिलाच स्वातंत्र्य दिन सोहळा. यावेळचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून हे फोटोज विविध ठिकाणाहून शेअर होतायेत.
ट्विटर युजर अंकुर सिंह यांनी एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केलाय. ‘एकाच जागी दोन मुख्यमंत्री कसे राष्ट्रीय ध्वजाला सलामी देतायत पहा’ अशा अर्थाचा मजकूर सोबत लिहिलाय.
१२०० पेक्षा अधिक लोकांनी हे ट्विट रीट्विट केलंय.
‘झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्यूट कुणाला मारताय? समोर सीबीआय दिसली की काय?’ या हेडलाईनसह दैनिक लोकमतच्या एका बातमीचा स्क्रिनशॉट सुद्धा जोरदार व्हायरल होत होता.
पडताळणी:
मुळात झेंड्याकडे पाठ करून कुणी झेंड्याला सलामी कसे देईल? हा साधा प्रश्न आहेच परंतु ‘लोकमत’ सारख्या प्रतिष्ठित दैनिकाने बातमी केलीय म्हणजे काही तथ्य असावे अशी कुणालाही शंका येईल.
परंतु कुठलेही वृत्तपत्र एखाद्या बातमीला एवढे बदनामीकारक, खोचक आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन कुत्सित शेरेबाजी करणारे शीर्षक देणे जवळपास अशक्य असल्याने हा स्क्रिनशॉट नक्कीच एडीट केलेला असणार, ही शंका येऊन ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीला सुरुवात केली.
काही कीवर्ड्स टाकून सर्च केले तर सर्व प्रकार समोर आला.
निलेश राणे यांचे ट्विट:
ध्वजारोहण सोहळ्याचा फोटो पोस्ट करत झेंडा मागे असताना मुख्यमंत्री पुढे कोणाला सॅल्युट करतायेत? समोर सीबीआय दिसली की काय अशा आशयाचे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले होते.
याच ट्विटच्या आधारे ठाकरे विरोधकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.
‘दैनिक लोकमत’ने राणेंच्या ट्विटमधील वाक्ये घेऊन बातमीची हेडलाईन केली, परंतु मुख्य मजकुरात या फोटो बाबत कुठेही कसलाही खुलासा केला नाही. त्यामुळे फोटो आणि बातमीच्या हेडलाईनचा स्क्रिनशॉट विविध व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये खरा समजूनच फिरत होता.
‘तो’ फोटो दिशाभूल करणारा:
आम्ही सर्वप्रथम निलेश राणेंनी ट्विट केलेला फोटो गूगल रिव्हर्स सर्च इमेजद्वारे शोधला. तेव्हा या फोटोला मिळतेजुळते आणखी काही फोटो समोर आले, जे की मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आले होते.
या मधील फोटो बघून लक्षात येईल की मुख्यमंत्री झेंड्याला नव्हे, तर गणवेशातील पोलिसांना सॅल्युट करतायेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झेंड्याला (uddhav thackeray national flag) नव्हे, तर समोर उभ्या असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सलामी देत असताना हा फोटो काढण्यात आलाय.
पोलीस अधिकाऱ्यांना वगळून केवळ ठाकरे दाम्पत्याचा फोटो ट्विट करून राणे यांनी लोकांची दिशाभूल केलीय.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय कडे हस्तांतरित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राणेंनी सदरील ट्विट केलेय.
हेही वाचा: ‘ठाकरे’ सरकारला तानाशाही म्हणत फिरतेय समीत ठक्करच्या अटकेची फेक पोस्ट!
[…] […]
[…] […]