Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचा उल्लेख शहीद असा केला? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगजेबाला देशासाठी प्राण देणारा शहीद सैनिक असे संबोधल्याचे दावे केले जातायेत. त्यासाठी ठाकरेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होताना दिसतेय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कमलाकर जोशी यांनी असाच एक व्हिडीओ व्हॉटस्ऍपवर व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. हे असेच दावे ट्विटर, फेसबुकवरून अनेकांनी केलेले पहायला मिळतायेत.

Uddhav Thackeray Aurangzeb Shahid viral tweeter claims
Source: twitter

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मूळ भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ पाहिला. ८ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहरात घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

भाषण ऐकल्यावर असे लक्षात आले की ते मुघल बादशहा औरंगजेबाविषयी (Aurangzeb) नव्हे तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हातून मारल्या गेलेल्या भारतीय जवान औरंगजेब विषयी बोलत आहेत. ज्या ‘TV9 मराठी’च्या व्हिडीओ क्लिप आधारे हे दावे पसरवले जात आहेत त्याच क्लिपचा संपूर्ण व्हिडीओ आम्हाला मिळाला.

उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण वक्तव्य:

“असाच एक सैनिक होता, तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. अनेक अतिरेकी त्याने मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवर म्हणून घरी जायला निघाला त्याचं मधल्या मध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मग एके दिवशी छिन्नविच्छिन्न झालेला हालहाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक नाव माहितीये त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब. जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? तो आमचा नाही मुसलमान होता? नाही तो माझ्या देशासाठी लढला तो हा देश माझी मातृभूमी समजतो, या देशासाठी जो मरायला तयार आहे. तो धर्माने कुणीही असला तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे.”

‘चेकपोस्ट मराठी’ने ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या सैनिकाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला २०१८ सालच्या विविध बातम्या सापडल्या. त्यापैकी ABP न्यूजच्या एका बातमीमध्ये अतिरेक्यांच्या ताब्यात असतानाचा औरंगजेबचा एक व्हिडीओ या बातमीत पहायला मिळाला. तसेच पुंछ मध्ये असलेल्या त्याच्या गावावरील शोककळा, त्याच्या कुटुंबियांची देशाप्रती असणारी भावना यात पहायला मिळाली. धर्मावरून देशभक्ती शोधणाऱ्यांच्या डोळ्यात मोठे अंजन घालणारी ही बातमी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद जाहीर सभेमध्ये मुघल बादशहा औरंगजेबाविषयी नव्हे तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हातून मारल्या गेलेल्या भारतीय जवान औरंगजेब विषयी बोलत आहेत. भाषणाचा अर्धवट व्हिडीओ कट करून ती क्लिप दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केली जात आहे.

हेही वाचा: ‘पंचांग फाडून टाका, हिंदू सण फालतू झालेत’ उद्धव ठाकरेंची व्हिडीओ क्लिप एडीटेड! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा