सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडीओमध्ये मुंबई पोलिस पीर हजरत मकदूम शाह दर्ग्यावर सलामी (Mumbai police saluting makhdoom shah dargah) देताना दिसताहेत. दावा केला जातोय की दर्ग्यावर सलामी देण्याची ही परंपरा प्रथमच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केली आहे.
ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर करताना दावा केलाय की मुंबई पोलिसांकडून प्रथमच पीर हजरत मकदूम शाहना सलामी. शिवसेना आता संपल्यात जमा आहे.
भाजप युवा मोर्चाशी संबंधित शिवानी दाणी वखरे यांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘सेक्युलॅरिझमच्या नावाखाली उद्धव ठाकरे अजून काय काय दाखवणार असा सवाल उपस्थित केलाय.
पडताळणी:
गुगल किवर्डच्या सहाय्याने व्हायरल व्हिडीओचा शोध घेतला असता ‘फाईट अगेन्स्ट क्रिमिनल न्यूज’ या युट्यूब चॅनेलवर दि. २९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई पोलिसांचा माहीमच्या बाबा मखदूम शाह दर्ग्यावर सलामी (Mumbai police saluting makhdoom shah dargah) देतानाचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी माहीमच्या बाबा मखदूम शाह दर्ग्यावर 607 व्या उर्सच्या निमित्ताने सलामी दिली. मुंबई पोलिसांची बाबा मखदूम शाह यांच्यावर श्रद्धा राहिलेली असून दरवर्षी भरणाऱ्या या उर्सच्या वेळी पहिली चादर मुंबई पोलिसांकडून चढविली जाते. प्रतिवर्षी डिसेंबरच्या महिन्यात उर्स भरविण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्स भरविला जाणार नाही. फक्त ५ जणांच्या उपस्थितीत उर्सची परंपरा पुढे चालवली जाईल.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी अजून शोधाशोध केली असता ‘सबरंग इंडिया’च्या वेबसाईटवर १४ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध लेख मिळाला. या लेखानुसार १० दिवसांच्या उत्सवात माहीमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दर्ग्यावर पहिली चादर चढविण्याची ही परंपरा १९११ सालापासून सुरु आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार १५ व्या शतकापासूनच बाबा मखदूम शाह माहीमी मुंबई पोलिसांचे संरक्षक संत समजले जातात.
‘नवभारत टाईम्स’च्या वेबसाईटवर २ मे २०१८ रोजी प्रसिद्ध रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांची बाबा मखदूम शाह यांच्यावर विशेष श्रद्धा राहिलेली आहे. यामागचं कारण असं की ज्यावेळी समुद्रात जहाज येत असे, त्यावेळी हे बाबा पोलिसांना कुठल्या जहाजात माल आहे किंवा नाही, याविषयीची माहिती देत असत. तेव्हापासूनच पोलीस या बाबांना मदतगार मानतात.
‘स्क्रोल’च्या रिपोर्टनुसार सध्याचे माहीम पोलीस ठाणे ज्याठिकाणी वसलेले आहे, तिथे बाबा १४ व्या शतकातील संत बाबा मखदूम शाह माहिमी राहत असत. या जागेपासून अवघ्या २०० मीटरच्या अंतरावर बाबांची दर्गा आहे. असे सांगितले जाते की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खोलीतील हिरव्या रंगाच्या स्टीलच्या कपाटात बाबा मखदूम शाह यांच्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. प्रतिवर्षी भरणाऱ्या १० दिवसांच्या उत्सवाच्या काळात भक्तांसाठी खुल्या केल्या जातात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांप्रमाणे मुंबई पोलिस पीर हजरत मकदूम शाह दर्ग्यावर सलामी देत असल्याची गोष्ट खरी आहे, मात्र त्याचा शिवसेनेशी अथवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारशी काहीही संबंध नाही.
एव्हाना या परंपरेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये देखील ती सुरुच होती, त्यात कुठलाही खंड नव्हता. ही परंपरा हा मुंबई पोलिसांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे.
हे ही वाचा– ठाकरे सरकारने 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवरील ‘हिंदू’ शब्द काढून टाकलाय?
[…] […]
[…] […]