सरकारी आणि खाजगी व्यवहारांतसुद्धा देशाच्या नावाचा उल्लेख ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ असाच व्हावा (bharat instead of india). असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून हा आदेश १५ जून २०२१ पासून लागू होणार असल्याचे दावे सोशल मीडियातून व्हायरल होतायेत.
सर्व भारतीयांना शुभेच्छा …!!
💐💐💐
मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार
१५ जून २०२१ पासून सगळीकडे आपल्या प्रिय भारतभूमी चे नाव “भारत” या नावानेच ओळखले जाईल. India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही.फक्त आणि फक्त “भारत”| जय अखंड हिंदुराष्ट्र …..!!
असे मेसेज, पोस्ट्स सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्ट्सशी संबंधित ऍडव्हान्स्ड की वर्ड्सच्या आधारे सर्च करून पाहिले असता नेमके प्रकरण काय हे समजले.
१. देशाचा उल्लेख ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ व्हावा याचिका २०१६सालची
महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते निरंजन भटवाल यांनी सदर याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ‘देशातील गरिबांसाठी फायद्याचं ठरेल असं काही, महत्वाचं काही असेल तर ठीक आहे परंतु हे असे भावनिक विषय घेऊन येऊ नका. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मनाप्रमाणे ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ हवं ते म्हणण्याचा अधिकार आहे. तुम्हीही हवं ते म्हणा.’ अशा काहीशा शब्दात तत्कालीन सरन्यायाधीश ठाकूर यांनी ती याचिका फेटाळून लावली होती. ‘द हिंदू‘ने न्यायालयात नेमके काय झाले याविषयी विस्तृत बातमी केली आहे.
२. याच विषयी दुसरी याचिका दाखल
त्याच विषयावर नमाह नावाच्या व्यक्तीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. ३ जून २०२० रोजीच्या ‘द हिंदू’च्या बातमीनुसार सरन्यायाधीश बोबडे यांनी यावर असे म्हंटले की, ‘भारतीय संविधानात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या (bharat instead of india) दोन्ही नावांचा उल्लेख आहे. इंडिया म्हणजेच भारत असे नमूद केले आहे.’ यावर याचिका कर्त्याने संविधानात ‘आर्टिकल १’ मध्येच उल्लेख असलेले वाक्य ”India, that is Bharat, shall be a union of states and the territory,” या वाक्यातच बदल व्हावा अशी विनंती केली.
संविधानात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही असे सांगत, सदर विषयावर केंद्र व संबंधित मंत्रीमंडळ काय निर्णय देते हे पहायला हवं असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
३. केंद्राने याविषयी आजतागायत भूमिका मांडली नाही
सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीची ऑर्डर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. सदर विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे असे त्यात नमूद केले आहे. ३ जून २०२० रोजीची ही ऑर्डर आहे. परंतु त्यानंतर केंद्राने सदर विषयावर काही मत व्यक्त केल्याची एकही बातमी उपलब्ध नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा कुठलाही आदेश दिला नाही ज्या नुसार येत्या १५ जून रोजी सरकारी व खाजगी कामकाजात देशाचा उल्लेख ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ करावा लागेल. याविषयी केंद्र सरकार स्वतःहून दखल घेईल तेव्हाच बदल घडण्याची शक्यता आहे, तोवर ‘इंडिया’ व ‘भारत’ दोन्ही नावे वापरास बंदी नाही.
हे ही वाचा: कोर्टाने जातीवरून शिवीगाळ प्रकरणात ऐट्रोसिटी अंतर्गत तक्रार करता येणार नसल्याचा आदेश दिलाय?
Be First to Comment