राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या फोटोसह ‘नया भारतीय संविधान’ नावाची एक पीडीएफ फाईल सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतेय. हिंदुत्ववादी-मनुवादी प्रतिगामी विचारसरणीला अनुसरून लिहिलेले नियम-कायदे या संविधानात लिहिलेले आहेत.
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करून हिंदुस्थान संबोधण्यात येणार, चातुर्वर्ण्यव्यवस्था-जातीव्यवस्था अंमलात आणली जाणार, महिला केवळ मुल जन्मास घालण्याचे साधन म्हणून देवाने तिला घडवले आहे, त्यानुसारच तिचे अधिकार ठरवले जाणार अशा विविध नियम-कायद्यांचा यात समावेश आहे.
ही १६ पानी पीडीएफ व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुधीर सोनटक्के यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने शोधाशोध केली असता असे लक्षात आले की ही पीडीएफ जानेवारी २०२० पासूनच व्हायरल होतेय.
या व्हायरल पीडीएफशी संघाचा काहीएक नसून संघाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देश्याने संघाच्या नावाने अशा प्रकारच्या खोडसाळ बाबी पसरवल्या जात असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
“संघाने अशा प्रकारचे कोणतेही पुस्तक प्रकाशित केलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारताचे नवीन संविधान’ नावाचे कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. हे संघाविरुद्धचे षड्यंत्र आहे. आम्ही जानेवारी 2020 मध्येच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. संघाचा भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे. लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये” असे संघ नेते श्रीधर गाडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
उत्तराखंडमधी बुलंदशहराच्या एका व्यक्तीवर सदर पीडीएफ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की ‘नया भारतीय संविधान’ या शीर्षकाखाली सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रतिमेसह व्हायरल होणारी नियम-कायद्यांची पीडीएफ कुणाचातरी खोडसाळपणा आहे. याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नाही. सदर पुस्तिका बनविणाऱ्यावर संघ नेत्यांनी विविध पोलीस स्थानकांत कायदेशीर गुन्हा दाखल केला असून व्हायरल करणाऱ्यावर बुलंदशहरमध्ये गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा: देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना संघाचे लोक इंग्लंडच्या राणीला सलामी ठोकत होते?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]