Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कॅनडाच्या पंतप्रधानांचे धरणे आंदोलन? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य!

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो दिसताहेत. त्यांच्या आजूबाजूला शीख समाजातील इतरही काही लोक बसलेले दिसताहेत. दावा केला जातोय की कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनास सुरुवात (canada pm joins farmers protest) केली आहे.

Advertisement

अजय कुमार झा आदर्श या फेसबुक युजरने ‘कनाडा – #किसानों के धरनें पर कनाडा का प्रधानमंत्री !’ या कॅप्शनसह पोस्ट केलेला हा फोटो २२१ युजर्सकडून शेअर करण्यात आलाय. इतरही अनेक युजर्स याच दाव्यासह हा फोटो शेअर करताना दिसताहेत.

Source: Facebook

ट्विटरवर देखील हा फोटो याच दाव्यासह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काळजी व्यक्त केलेली आहे. शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला कॅनडाचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया जस्टिन ट्रूडो यांनी दिली होती.

मात्र या आंदोलनाच्या समर्थनार्थ खुद्द जस्टिन ट्रूडो धरणे देत असल्याची (canada pm joins farmers protest) बातमी मात्र आमच्या वाचनात आलेली नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल फोटोची पडताळणी सुरु केली. व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता आम्हाला ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या वेबसाईटवरील एका बातमीत हा फोटो आढळून आला.

‘हिंदुस्थान टाईम्स’च्या वेबसाईटवर दि. २४ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित बातमीनुसार दिवाळीच्या औचित्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो राजधानी ओटावामधील मंदिर आणि गुरुद्वाऱ्यामध्ये गेले होते. त्यांनी भारतीय वंशाच्या कॅनडियन नागरिकांसह दिवाळी साजरी केली होती. त्यावेळचा हा फोटो आहे.

उपस्थित नागरिकांना संबोधित करण्यापूर्वी जस्टिन ट्रूडो मंदिरातील पूजा आणि आणि गुरुद्वाऱ्यातील गुरुबानीला देखील उपस्थित राहिले होते. दिवाळी हा केवळ भारतीय सण राहिला नसून त्याचे जागतिक उत्सवात रूपांतर झाले असल्याचे मत ट्रूडो यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

जस्टीन ट्रूडो यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलेला असला तरी भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खुद्द ट्रूडो हेच आंदोलनाला बसले असल्याचे दावे पूर्णतः चुकीचे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल फोटो सध्याचा नसून तो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे.

हे ही वाचा- आंदोलक शेतकरी रामाचा विरोध करताहेत का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा