सोशल मीडियावर हिरवी पगडी घातलेल्या पंजाबी व्यक्तीचं एक पोस्टर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय. हे पोस्टर कथित स्वरूपात ‘नॅशनल जिओग्राफिक’चं कव्हर पेज (national geographic farmers protest) असल्याचा दावा केला जातोय. दिल्ली-हरयाणा सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेताना ‘नॅशनल जिओग्राफिक’ने आंदोलक शेतकऱ्याला कव्हर पेजवर स्थान दिलं असल्याचं सांगितलं जातंय.
काँग्रेसचे माजी खासदार डॉ. अजॉय कुमार यांनी हे पोस्टर शेअर केलंय. कॅप्शनमध्ये ते म्हणतात की, “जग बघतंय की कशाप्रकारे आपण आपल्या अन्नदात्यांना नाराज करतोय”
पंजाबी एकता पार्टीचे अध्यक्ष आणि पंजाब सरकारमधील माजी विरोधी पक्ष नेते सुखपाल सिंग खैरा यांनी देखील हा फोटो शेअर करत आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असताना देखील शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या माध्यमांवर टीका केलीये.
पडताळणी:
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असलेल्या ग्राफिकच्या उजव्या बाजूला ‘विंटर २०२०’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या वेबसाईटला भेट देऊन गेल्या वर्षीच्या सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतील अंकांचे कव्हर पेज तपासले, मात्र आम्हाला कुठल्याही अंकावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो बघायला मिळाला नाही.
व्हायरल फोटो निरखून बघितल्यास लक्षात येईल की फोटोच्या खालच्या बाजूला @anoopreet नावाच्या हँडलचा उल्लेख आहे. याच आधारे इंस्टाग्रामवर शोध घेतला असता आम्हाला अनुप्रीत नामक इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो अपलोड झाला असल्याचे आढळून आले. फोटोसोबत एक पोस्ट देखील आहे आणि पोस्टच्या शेवटी हे काल्पनिक कव्हर असल्याचं सांगण्यात आलंय.
रवी चौधरी हे पीटीआय या वृत्तसंस्थेचे फोटो जर्नलिस्ट असून त्यांनी काढलेला फोटो अनुप्रीतने काल्पनिक कलाकृतीसाठी वापरला आहे. याचा ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या अंकाशी (national geographic farmers protest) काहीही संबंध नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की आंदोलक शेतकऱ्याच्या फोटोला ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आलेलं नाही. सोशल मीडियावर केले जात असलेले दावे चुकीचे आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलं जात असलेलं ग्राफिक हे एक ‘आर्ट वर्क’ असून ते बनवणाऱ्या अनुप्रीतने हे काल्पनिक कव्हर असल्याचं देखील सांगितलेलं आहे.
हे ही वाचा- आंदोलक शेतकऱ्यांनी ‘जिओ’च्या टॉवरची जाळपोळ केलेली नाही, व्हायरल व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा!
Be First to Comment