Press "Enter" to skip to content

UPSC परीक्षेत ‘इस्लामिक स्टडीज’ विषय घेऊन IAS होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढलीये?

सोशल मीडियावर दावा केला जातोय की UPSC परीक्षेत अनेक उमेदवार ‘इस्लामिक स्टडीज’ हा विषय (islamic studies in upsc) घेऊन IAS बनताहेत. त्यामुळे रामायण,गीता, उपनिषद यांचा देखील UPSC परीक्षेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यायला हवा. सनातन धर्माविषयी एवढा तिरस्कार का, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

अर्काइव्ह

काही युजर्सकडून आपापल्या धार्मिक पसंतीनुसार शीख, बौद्ध, जैन यांसारख्या विविध धर्माशी संबंधित विषयांचा यूपीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली जातेय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील अनेक युजर्सकडून साधारणतः अशाच प्रकारचे दावे केले जाताहेत.

पडताळणी:

UPSC परीक्षेच्या अभ्यासक्रमात खरंच ‘इस्लामिक स्टडीज’ हा विषय आहे का हे पडताळण्यासाठी आम्ही यूपीएससीच्या वेबसाईटला भेट दिली. वेबसाईटवर युपीएससीने आयोजित केलेल्या परीक्षेचे नॉटीफिकेशन बघायला मिळाले. या नॉटीफिकेशनमध्ये कुठेही परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ हा विषय (islamic studies in upsc) असल्याचे आढळले नाही.

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी सात विषय असतात. त्यापैकी पाच विषय अनिवार्य असतात आणि उरलेले दोन विषय ऐच्छिक असतात. युपीएससीच्या वेबसाईटवरील नोटिफिकेशनमधील २५ ऐच्छिक विषयांची यादी खाली दिली आहे. यात कुठेही ‘इस्लामिक स्टडीज’ हा विषय बघायला मिळत नाही.

Source: UPSC

पडताळणी दरम्यान आम्हाला आयएएस अधिकारी सोमेश उपाध्याय यांचे एक ट्विट मिळाले. ट्विटमध्ये सोमेश उपाध्याय यांनी उपरोधिकपणे युपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडी’ नावाचा विषय नसल्याचे स्पष्ट केले आहे. ट्विटमध्ये सोमेश उपाध्याय म्हणतात, “एक समांतर जग अस्तित्वात आहे, जिथं युपीएससीच्या अभ्यासक्रमात इस्लामिक स्टडीज नावाचा वैकल्पिक विषय देखील आहे. त्या जगाचं नाव व्हाटसअप युनिव्हर्स आहे.”

UPSC परीक्षेत ‘इस्लामिक स्टडीज’ या अफवेचं मूळ नेमकं कुठे?

युपीएससीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ उपयोगी नसल्याने अभ्यासक्रमातून हा विषय हटविण्यात यावा अशी मागणी भाजपचे राज्यसभा सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी गेल्या वर्षी केली होती. तसेच आपण हा विषय राज्यसभेत मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

भाजप खासदाराच्या या मागणीनंतर ‘सुदर्शन न्यूज’च्या सुरेश चव्हाणके यांनी याच विषयावर एक चर्चा देखील आयोजित केली होती. या प्रकाराला त्यांनी ‘युपीएससी जिहाद’ आणि ‘नौकरशाही जिहाद’ असं म्हंटलं होतं.

अर्काइव्ह

चव्हाणके यांनी आयएएस आणि आयपीएस सारख्या कठीण परीक्षांमधील मुस्लिम उमेदवारांच्या वाढलेल्या टक्क्याबद्दल आपण खुलासा करणार असल्याचा दावा केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह आयपीएस असोशिएशनने देखील चव्हाणके यांच्या व्हिडीओचा निषेध केला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की यूपीएससीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ या विषयाचा समावेशच नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात नसलेला विषय घेऊन मोठ्या प्रमाणात उमेदवार IAS होण्याचा प्रश्नच नाही.

हेही वाचा- बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर फक्त मुस्लिमांचा भरणा? व्हायरल यादी दिशाभूल करणारी!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा