Press "Enter" to skip to content

भाजप नेत्यांनी देहरादून स्टेशनच्या संस्कृत नावाबाबत शेअर केले अर्धसत्य!

सोशल मिडीयावर सध्या देहरादून रेल्वे स्टेशनच्या बोर्डचा फोटो व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की पूर्वी बोर्डवरचं नाव उर्दू भाषेत होतं, ते बदलून संस्कृत भाषेत करण्यात आलंय.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवर हा फोटो ट्वीट केलाय. कॅप्शनमध्ये संस्कृत असं लिहिलंय. पात्रा यांचं हे ट्वीट जवळपास १९ हजार ७०० वेळा रीट्वीट करण्यात आलंय.

Advertisement
Credit- Twitter

अर्काइव्ह पोस्ट

पात्रा यांच्या ट्वीटमधील फोटोज व्यवस्थितपणे बघितल्यास लक्षात येतं की पहिल्या फोटोमध्ये बोर्डवरील नाव इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत आहे, तर दुसऱ्या फोटोत हेच नाव इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेत आहे.

पात्रा सुचवू इच्छितायेत की उर्दू भाषेतील नाव बदलून संस्कृतमध्ये करण्यात आलंय.

पात्रा यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी देखील एक रिट्वीट केलंय.

सहस्त्रबुद्धे यांनी रिट्वीट केलेल्या मूळ ट्वीटमध्ये दावा करण्यात आलाय की रेल्वे मंत्रालयाने उत्तराखंडमधील सर्व रेल्वे स्टेशनच्या बोर्डवरील सर्व उर्दू नावं संस्कृतद्वारे बदलण्याचा निर्णय घेतलाय.

Credit- Twitter

अर्काइव्ह पोस्ट

‘इगल आय’ या हँडलवरून करण्यात आलेलं हे ट्वीट रिट्वीट करताना सहस्त्रबुद्धे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या महत्वपूर्ण उपक्रमाकडे लक्ष्य वेधल्याबद्दल संबंधिताचे आभार मानले आहेत.

पडताळणी:

सोशल मिडीयावरील या व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही देहरादूनचं संस्कृतमध्ये नाव असलेला फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला ‘हिंदुस्तान टाईम्स’ मध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आलेली बातमी मिळाली.

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या बातमीनुसार भाजपच्या उत्तराखंडमधील स्थानिक नेत्याने जानेवारी २०१९  मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून उत्तराखंडमधील रेल्वे स्टेशनची नावं संस्कृतमध्ये का नाहीत यासंदर्भात विचारणा केली होती.  

रेल्वे मॅनुअलनुसार रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर राज्याच्या द्वितीय भाषेतून नाव असणं आवश्यक आहे आणि संस्कृत ही उत्तराखंडची अधिकृत दुसरी भाषा असल्याने राज्यातील रेल्वे स्टेशनच्या बोर्डवरील नाव संस्कृतमध्ये असावं, असा दावा या नेत्याने केला होता.

त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये देहरादून स्टेशनच्या बोर्डवरील उर्दू नाव बदलून संस्कृतमध्ये ‘देहरादूनम’ असं करण्यात आलं होतं. देहरादून बरोबरच नव्याने सुरु करण्यात आलेल्या ऋषिकेश स्थानकाला देखील ‘योग नगरी ऋषिकेशाह’ असं नाव देण्यात आलं होतं.

दरम्यान ‘बोर्डवरील देहरादून हे उर्दू नाव बदलून ‘देहरादूनम’ असं संस्कृत नाव कन्स्ट्रक्शन एजन्सीकडून देण्यात आलं होतं. नंतरच्या काळात ते परत उर्दू करण्यात आल्याची माहिती मुरादाबाद रेल्वे स्टेशनच्या सिनिअर डिव्हिजनल कमर्शिअल मॅनेजर रेखा शर्मा यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना दिली होती.

त्यानंतर आम्हाला डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्या ट्वीटर हँडलवरून दि. ७ फेब्रुवारी रोजी  देण्यात आलेलं एक पत्र देखील मिळालं. या पत्रात उत्तराखंडमधील रेल्वे स्टेशनच्या साईनबोर्डवरील उर्दू नावं संस्कृत नावांनी बदलण्याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे.

या पत्रात म्हंटलंय की, “उत्तराखंडमधील रेल्वे स्टेशनच्या साईनबोर्डवरील उर्दू भाषेतील नाव हटविण्याविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्यांच्या संदर्भाने हे स्पष्टीकरण देण्यात येतंय की भारतीय रेल्वेने कुठल्याही स्टेशनवरील उर्दू नाव हटविलेलं नाही आणि सद्यस्थितीत असं काही करण्याचा इरादा देखील नाही.  

रेल्वे स्टेशनच्या साईनबोर्डवर एक अतिरिक्त भाषा म्हणून संस्कृत भाषेतील नाव लिहिलं जाऊ शकेल, परंतु उर्दू भाषेतील नाव हटवून संस्कृतमध्ये नाव लिहिलं जाणार नाही.

संस्कृत नावावर उर्दू नावाचे स्टिकर चिकटवतानाच्या फोटोसह ‘आज तक’ची १४ फेब्रुवारी २०२०ची बातमी.

aaj tak news showing sanskrit station name replaced with urdu
Source: Aaj Tak

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की कुठल्याही आदेशाविना देहरादून रेल्वे स्टेशनच्या साईनबोर्डवरील उर्दू नाव बदलून संकृतमध्ये करण्याचं काम कन्स्ट्रक्शन एजन्सीने केलं होतं. प्रकरण समोर आल्यानंतर भारतीय रेल्वेने स्टेशनचे उर्दू नाव हटवण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट करत देहरादून स्टेशनच्या नावात पुन्हा दुरुस्ती केली आणि उर्दू नाव लावले.

हीच गोष्ट राज्यातील इतर रेल्वे स्टेशनवरील साईनबोर्डला देखील लागू आहे. एक अतिरिक्त भाषा म्हणून संस्कृत भाषेचा विचार केला जाऊ शकतो, परंतु उर्दू मधील नाव हटवून त्या ठिकाणी संस्कृतमधील नाव लिहील जाणार नाही, हे भारतीय रेल्वेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 

उर्दूचे संस्कृत आणि संस्कृतचे पुन्हा उर्दू नाव होण्याचा घटनाक्रम १४ फेब्रुवारी २०२०च्या अगोदरच पूर्ण झाला होता. तरीही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी जुलै महिन्यात स्टेशनच्या संस्कृत नावाचे जुने फोटो शेअर करत अर्धसत्य सांगून लोकांची दिशाभूल केलीय.

हे ही वाचा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत सोनिया गांधींना नमन करत उभे राहिलेत का ?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा