Press "Enter" to skip to content

मुस्लिम समाजाने इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली आहे?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुणीतरी व्यक्ती एका रॅलीसमोर भाषण देत असताना बघायला मिळतेय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की रॅलीसाठी जमलेली गर्दी ब्रिटनमधील मुस्लिम समाजाची असून इंग्लंडला इस्लामिक राष्ट्र (Islamic State) घोषित करण्याच्या मागणीसाठी हे लोक रस्त्यावर उतरले आहेत.

Advertisement

इंग्लंडमधील मूळ रहिवासी आधी झोपले होते आणि आता लोकसंख्या (मुस्लिम समुदायाची) प्रमाणाबाहेर वाढल्याने ही मागणी झालेली आहे, अशी वेळ भारतावर येऊ नये, असाही दावा या व्हायरल व्हिडिओसोबाबत केला जातोय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली, राजेंद्र काळे आणि दिग्विजय डुबल यांनी हे दावे व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हिडीओ व्यवस्थितरीत्या बघितला असता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे व्हिडिओत कुठेही इंग्लडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. ना व्हिडिओत भाषण देत असलेली व्यक्ती अशा प्रकारची मागणी करतेय, ना तश्या मागणीचे कुठलेही फलक किंवा बॅनर बघायला मिळताहेत.

गुगल किवर्डसच्या आधारे अधिक शोध घेतला असता आम्हाला ‘अल्ट न्यूज’चा रिपोर्ट मिळाला. रिपोर्टनुसार व्हिडीओ लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स बाहेरील प्रदर्शनाचा आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या प्रवेशद्वारासमोरील १२व्या शतकातील इंग्लिश सम्राट रिचर्ड I च्या पुतळ्यावरून व्हिडीओ त्याच ठिकाणचा असल्याची खात्री पटविण्यात आली आहे.

यूट्युबवर या प्रदर्शनाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तकबीर टीव्ही या युट्यूब चॅनेलवरून १९ ऑक्टोबर २०१२ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. म्हणजेच व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास ९ वर्षांपूर्वीचा आहे.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार, लंडनमधील संसदेच्या सभागृहाबाहेर “इस्लामविरोधी” चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली. या प्रदर्शनाचा हा व्हिडीओ आहे.

ब्रिटनच्या संसदेबाहेर 6 ऑक्टोबर 2012 रोजी ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ (Innocence of Muslims)या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. इस्लामिक संघटनांकडून या चित्रपटात इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांना बदनाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. निषेध प्रदर्शनांमध्ये काही जणांचा जीव देखील गेला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मुस्लिम समुदायाने ब्रिटिश सरकारला इंग्लंडला इस्लामिक राष्ट्र घोषित करण्यासाठी धमकी दिल्याचा दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडीओ जवळपास ९ वर्षांपूर्वीचा असून ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या चित्रपटाविरोधातील प्रदर्शनाचा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा- लंडनमध्ये मुस्लीम वचक एवढा वाढला की कट्टरपंथीयाचे थेट रस्त्यावर नमाज पठण? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा