उत्तराखंडमधील हिंदू तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथ (Badrinath) मंदिरात काही मुस्लीम लोकांनी नमाज पठण केले. हिंदू लोकांनी ते शांतपणे सहन केले. आता याच लोकांकडून बद्रीनाथ मंदिर नसून बद्रुद्दीन शाह (Badruddin Shah) दर्गा असल्याचा दावा केला जातोय. तसेच बद्रीनाथ मंदिरावर कब्जा करण्याची धमकी दिली जातेय, हे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘बद्रीनाथ में मुसलमानों द्वारा नमाज पढे जाने के बाद हिन्दू चुप रहने से मुस्लिम समाज कि ओर से ये पहली किस्त आ ही गई .’ अशा कॅप्शनसह एका मौलानाच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला जातोय.
ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हे दावे व्हायरल होतायेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गोविंद भुजबळ यांनी ‘9172011480‘ या आमच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर व्हायरल दावे फॉरवर्ड करून पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हिडिओच्या कॅप्शनमधील उल्लेखाप्रमाणे खरंच मुस्लीम समाजाने बद्रीनाथ मंदिरात नमाज पठण केले का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ऍडव्हान्स्ड की-वर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले.
- आम्हाला बद्रीनाथ मंदिर ज्या ‘चामोली’ जिल्ह्यात आहे त्या चामोली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विट सापडले.
- ट्विटमध्ये पोलीस अधीक्षक यशवंत सिंह चौहान यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओ आहे. त्यांनी मंदिरातील नमाज पठणाचा दावा तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.
“पोलिस चौकशीनुसार असे निष्पन्न झाले की मंदिर परिसरात नमाज पठण केल्याच्या दाव्यास काहीएक आधार नाही. ना त्याचे फोटोज, व्हिडीओज आहेत ना त्याचे कुणी साक्षीदार. तपासात असे लक्षात आले की मंदिरापासून साधारण १ किलोमीटर दूर चालू असणाऱ्या बांधकामाकरिता आलेल्या १५ मजुरांनी २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता बांधकामाच्या खाजगी जागेतच नमाज पठण केले होते. त्यासाठी ना मौलवी बोलवलेले ना ही लाउड स्पीकर लावलेला. याचा जर कुणी मंदिराशी संबंध जोडत असेल तर चुकीचे आहे.”
अशी माहिती त्यांनी दिलीय.
- व्हायरल दाव्यातील दुसरी बाब म्हणजे तो व्हिडीओ ज्यामध्ये एक मौलाना बद्रीनाथ (Badrinath) मंदिराची जागा म्हणजे बद्रुद्दीन शाह (Badruddin Shah) दर्गा असल्याचा दावा करत आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे शोधण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला.
- पडताळणीमध्ये सदर व्हिडीओ आताचा नसून जवळपास तीन-साडे तीन वर्षापूर्वीचा असल्याचे लक्षात आले. युट्युबवर १६ नोव्हेंबर २०१७ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
- व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘सहारनपुर के देवबंद में उत्तराखंड के रक्षा अभियान दल द्वारा बद्रीनाथ में रहने वाले मुसलमानों को गोमूत्र व गंगाजल पीने, नहीं तो बद्रीनाथ छोड़ने की धमकी दिए जाने पर दारुल उलूम निसवा के मोहतमिम मौलाना अब्दुल लतीफ ने कहा है कि धमकी देने वाले संगठन को शायद पता नहीं है कि बद्रीनाथ बदरुद्दीन शाह है जो मुसलमानों का धार्मिक स्थल है।’ अशी माहिती आहे.
- हिंदू संघटनेद्वारे मुस्लीम रहिवाश्यांना धमकी आणि त्यावर मौलानाचे वक्तव्य या दोन्ही बाबी सत्य असल्याचे माध्यमांतील बातम्यांवरून स्पष्ट झाले.
- मौलानावर त्यावेळी चहूबाजूंनी टीका झाली तेव्हा त्यांनी जाहीर माफी मागितली होती असे दैनिक जागरणने बातमीत सांगितले आहे.
- आता पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये या मौलानावर ‘एफआरआय’ दाखल करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांकडून समजते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की व्हायरल दाव्यातील पहिली बाब म्हणजे बद्रीनाथ मंदिरात मुस्लीम समुदायाचे नमाज पठणाचे दावे फेक आहेत. तसेच बद्रीनाथ नव्हे बद्रुद्दीन शाह दर्गा असल्याचा दावा करणाऱ्या मौलानाचा व्हिडीओ ३-४ वर्षे जुना आहे.
सद्यस्थितीत या दोन्हीही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने काही लोकांकडून जाणीवपूर्वक व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रयत्न केले जाताहेत.
हेही वाचा: ‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले? वाचा सत्य!
[…] […]
[…] […]