नाशिकमध्ये नुकतेच 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्यानंतर आता सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोसोबत दावा केला जातोय की महाराष्ट्र सरकारने एक नवीन प्रथा सुरू केली आहे, पूर्वी साहित्य संमेलनाची सुरुवात सरस्वती वंदनेने व्हायची, आता साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने होते.
फेसबुकवर देखील हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
नाशिक येथे पार पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाविषयीची सविस्तर बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
बातमीनुसार संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून प्रस्थान ठेवले. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिराण खोसकर यांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर भुजळांनी हाती विणा धरला आणि उपस्थितांनी माना डोलावल्या.
ग्रंथदिंडीचे वातावरण अतिशय भक्तीमय झालेले पहायला मिळाले. पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वतः विना घेऊन ग्रंथ दिंडीत चालत होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथ दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर यांनी ठेका धरला. संपूर्ण बातमीमध्ये कुठेही साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने झाल्याचा उल्लेख नाही.
जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा सध्या व्हायरल होत असलेला फोटो नेमका कुठला आहे हे शोधताना आम्हाला सुप्रिया सुळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेला साधारणतः 2 मिनिटांचा व्हिडीओ मिळाला. सुप्रिया सुळे या 4 डिसेंबर रोजी समीर शमीम खान यांच्या निकाह समारोहास उपस्थित राहिल्या होत्या. याच समारोहातील हा फोटो आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने करण्यात आल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचा एका निकाह समारंभातील उपस्थितीचा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जातोय.
हेही वाचा- ठाकरे सरकारने 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवरील ‘हिंदू’ शब्द काढून टाकलाय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment