झारखंडच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS Jharkhand) छापा मारून तब्बल दहा हजार सिमकार्ड जप्त केले. हे सर्व सिमकार्ड ‘जावेद’ (Javed Ahmad) या ‘जिहादी’च्या नावावर होते. या माध्यमातून तो फेसबुकवर जातीय-धार्मिक तेढ पसरवत होता असे दावे करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.
‘गजब हो गया भाई, १०,००० (दस हजार ) सिम…!! 10000 आईडी चला रहा है .. एक ही बंदा दोस्तों ये ३ मिनट का वीडियो अवश्य देखें ।’ अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. जवाहरलाल साळुंखे यांनी व्हॉट्सऍपवरही सदर व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
सदर व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती नितीन शुक्ला यांनी या आधी देखील दिशाभूल करणारे व्हिडीओज प्रसारित केले आहेत. त्यांच्याच ‘नरेंद्र मोदी यांनी नव्हे तर डॉ. मनमोहन सिंह यांनीच देश विकला’ सांगणाऱ्या व्हिडीओची ‘चेकपोस्ट मराठी’ने पुराव्यानिशी पडताळणी केली आहे. ती आपण ‘येथे‘ वाचू शकता.
- सध्या व्हायरल व्हिडीओतील मूळ बातमी वाचण्यासाठी आम्ही गुगल सर्च केले असता ती बातमी २०१८ सालची असल्याचे समजले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या मूळ बातमीचा आधार घेतच शुक्ला यांनी हा व्हिडीओ बनवला होता. यावर स्वतः टाईम्सने ‘फॅक्ट चेक‘ केले होते.
- टाईम्सच्या रिपोर्टनुसार हे खरे आहे की झारखंडच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS Jharkhand)कारवाई केली होती त्यात जावेद अहमद (Javed Ahmad) या व्यक्तीच्या नावे ७००० सीम कार्ड्स नोंद असल्याचा आरोप होता. या संबंधी ३ जणांना अटक केली होती परंतु ही नोंद TRAI- टेलिकॉम ऑथोरीटी ऑफ इंडियाच्या नियमानुसारच असल्याने त्या तिघांना सोडण्यात आले होते.
- ‘द टेलिग्राफ‘च्या बातमीनुसार ATS अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितले की पटना येथे नोंद असलेल्या ‘वन एक्सल’ या कंपनीच्या नावे हे सिमकार्ड घेतले आहेत. ‘एअरटेल’ कंपनीच्या अधिकाऱ्यानेही हे स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीच्या नावे केवळ ९ सिमकार्ड घेता येतात. त्यानंतर नवे सीम घेतल्यास जुने सीम आपोआप बंद होते. एवढे सिम केवळ कंपनीच्या नावेच देता येतात.
- टेलिग्राफच्याच बातमीनुसार मुरुगन यांनी हे स्पष्ट केले आहे की तपास कार्य चालू आहे, अजून तरी या कंपनीकडून किंवा संबंधीत व्यक्तींकडून काही संशयास्पद कृत्ये घडत असल्याचे आढळले नाही.
- नितीन शुक्ला यांनी युट्युबवरील त्यांच्या अधिकृत चॅनलवरून प्रसारित केलेला तो व्हिडीओ सार्वजनिक वरून ‘प्रायव्हेट‘ केला असल्याचे आढळले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओतील दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. ते १०००० सीम कार्ड्स ‘जावेद’च्या वैयक्तिक नावावर नसून ‘वन एक्सल’ या कंपनीच्या नावे आहेत आणि या सिम कार्ड्सचा वापर करून कुठलेही जात-धर्म विषयक तेढ निर्माण होईल असे कृत्य केले जात नव्हते.
हे ही वाचा: मुस्लीम नावांनी बुक असलेले बेड रिकामेच आढळल्याचे ‘बेड जिहाद’चे दावे फेक!
[…] […]
[…] […]
[…] […]