Press "Enter" to skip to content

तिरुपती देवस्थान विश्वस्ताच्या घरावर पडला छापा? जप्त केलेल्या सोन्याचा व्हिडीओ व्हायरल? वाचा सत्य!

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (Tirumala Tirupati Devasthanams) एका विश्वस्ताच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला त्यात १२८ किलो सोने १५० करोड रोकड आणि ७० करोड किमतीचे हिरे सापडले. त्याच जप्तीची दृश्ये असल्याचे सांगत सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल दावा:

आयकर विभागाच्या छापां मध्ये हा तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान मध्ये जी 16 विश्वस्त आहेत त्यापैकी हा एक विश्वस्त आहे त्याच्या घरी आय कर विभाग ने छापे मारले 128 किलो सोने 150 करोड कॅश आणि 70 करोड चे हिरे सापडले आहेत भक्तांनाे विचार करा आपला पैसा कुठे जात आहे सोळा विश्वस्तांनपैकी पैकी एकाकडे एवढा पैसा तर बाकी च्या कडे किती असेल? अशा मंदिरांना दान करु नका. दान करायचे असेल तर आश्रमांना अनाथाश्रमांना करा. कोणत्याही मंदिराला दान करु नका.

viral claims about Tirupati trustee raid on facebook
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शांताराम मुऱ्हे, राजेंद्र काळे, प्रसन्ना घुमे आणि विलास मोहिते यांनी फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स इनव्हीडच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता तेलुगु स्टॉप, द न्यूज ग्लोरी या पोर्टल्सवरील 21 डिसेंबर 2021 रोजीच्या बातम्या मिळाल्या. दोन्ही बातम्यांमधील मजकुरानुसार तमिळनाडूमधील वेल्लोरच्या अनैकत परिसरात एका सोन्याच्या दुकानावर दरोडा पडला. चोरांनी 15 किलो सोने चोरून नेले. परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना चोर पकडण्यात यश आले.

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चोरांनी सोने स्मशानात ल्पव्ल्याची कबुली दिली. शोधाशोध झाल्यानंतर हेच सोने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पंचनामा करताना ते सर्व दागिने टेबलवर मांडले होते. त्याचवेळचा हा व्हिडीओ आहे. सोन्याच्या दागिन्यांवर पांढऱ्या रंगाच्या स्ट्रिप्ससुद्धा दिसत आहेत ज्यांवर त्या दागिन्याचे वजन लिहिलेले असते.

तिरुपती देवस्थान विश्वस्ताचा भ्रष्टाचार?

होय हे खरे आहे की तिरुपती देवस्थानचे विश्वस्त शेखर रेड्डी (Sekhar Reddy) यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा पडला आणि त्यांच्याकडून 106 कोटी रोकड आणि 100 किलो सोने जप्त केले होते. परंतु ही घटना 2016 सालची आहे. शेखर रेड्डी खाणकाम व्यावसायिक आहेत. जप्त केलेली रक्कम ते आणि त्यांच्या दोन पार्टनर्सकडून जप्त केलेली आहे. जप्त झालेले दागिने नव्हे तर सोन्याच्या विटा होत्या.

न्यू इंडियन एक्स्प्रेस‘च्या बातमीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री ‘एन चंद्राबाबू नायडू’ (N Chandrababu Naidu) यांनी या शेखर रेड्डी यांच्यामुळे संपूर्ण तिरुपती देवस्थानाची बदनामी होतेय या कारणास्तव रेड्डींची विश्वस्तपदावरून हकालपट्टी केली होती. त्यावेळच्या कुठल्याही बातमीत हे स्पष्ट झालेले नाही की रेड्डी यांनी देवस्थानच्या संपत्तीमध्ये भ्रष्टाचार केला होता.

२०२० साली प्रसिद्ध झालेल्या ‘द हिंदू’च्या बातमीनुसार मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआयच्या शेवटच्या अहवालास अनुसरून असे मत नोंदविले आहे की शेखर रेड्डी यांच्या विरोधात उभे राहतील असे ठोस पुरावे नाहीत. यानंतर तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी रेड्डी यांना पुन्हा नामांकित करण्यात आले होते तसेच देवस्थानच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार हे स्पष्ट झाले की तिरुपती देवस्थानचे विश्वस्त असणाऱ्या शेखर रेड्डी यांच्यावर आयकर विभागाचे छापे पडले आणि त्यात सोने व रोकड जप्त केले, परंतु ही घटना आताची नसून ५ वर्षे जुनी आहे. तसेच व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुसऱ्या एका घटनेचा आहे. याचा तिरुपती देवस्थानाशी काहीएक संबंध नाही. याचाच अर्थ व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

हेही वाचा: तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने राम मंदिरासाठी एक अब्ज रुपये देणगीची घोषणा केलेली नाही, व्हायरल दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा