सोशल मीडियावर ‘फर्स्ट इंडिया न्यूज’ या न्यूज चॅनेलच्या न्यूज बुलेटिनचा स्क्रीनशॉट शेअर केला जातोय. या स्क्रिनशॉटच्या आधारे दावा केला जातोय की केंद्रीय गृह मंत्रालयाने ३१ डिसेंबरपर्यंत देशभरातील शाळा आणि कॉलेजेस बंद (school colleges closed till december 31) ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
पडताळणी:
सोशल मीडियावर व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही ३१ डिसेंबरपर्यंत देशभरातील शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याच्या (school colleges closed till december 31) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशासंबंधीच्या बातमीचा शोध घेतला.
आम्हाला एबीपी न्यूजची एक बातमी मिळाली. या बातमीनुसार हिमाचल प्रदेश सरकारने 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले. परंतु हा निर्णय हिमाचल सरकारने घेतला असून तो राज्यातील शाळा-कॉलेजेस पुरताच मर्यादित आहे. त्याचा देशभरातील शाळा-कॉलेजेसशी काहीही संबंध नाही.
आम्हाला मुंबईमधील शाळा-कॉलेजेस देखील ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या देखील अनेक बातम्या बघायला मिळाल्या. मात्र , कुठल्याही विश्वासार्ह माध्यमामध्ये संपूर्ण देशभरातील शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यासंबंधीची कुठलीही बातमी वाचायला किंवा बघायला मिळाली नाही.
आम्ही गृह मंत्रालयाच्या वेबसाईटला देखील भेट दिली. परंतु तिथे देखील आम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत देशभरातील शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यासंबंधीचे कुठले आदेश बघायला मिळाले नाही.
पडताळणी दरम्यान आम्हाला सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये मात्र सोशल मीडियावर व्हायरल दावा फेक असल्याचं सांगण्यात आलंय. गृह मंत्रालयाकडून असे कुठलेही आदेश देण्यात आले नसल्याचे या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्हाला ‘फर्स्ट इंडिया न्यूज राजस्थान’ या ट्विटर हँडलवर देखील एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की फर्स्ट इंडिया न्यूजच्या ब्रेकिंग न्यूज प्लेट एडिट करून सोशल मीडियावर स्क्रिनशॉट व्हायरल केला गेलाय. या पोस्टशी चॅनेलचा काहीही संबंध नाही. चॅनेलची लीगल टीम या प्रकरणात पुढील कारवाई करेल, असं देखील ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ३१ डिसेंबरपर्यंत देशभरातील शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यासंबंधीचे कुठलेही आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले नाहीत.
सोशल मीडियावरील व्हायरल स्क्रिनशॉट एडिटेड आहे. केंद्र सरकारकडून तसेच ज्या चॅनेलच्या स्क्रिनशॉटच्या आधारे सोशल मीडियावर दावा व्हायरल होतोय, त्या चॅनेलकडून देखील हा दावा फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा- सरकारकडून शेतकऱ्यांना महिना ३००० रुपये पेन्शन जाहीर करण्यात आलंय?
Be First to Comment