वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये २३.९ टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली. या घसरणीनंतर सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जातोय की कोरोना महामारीमुळे अमेरिका, सिंगापूर आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त घसरला (worst gdp drop) आहे.
अमेरिकेच्या जीडीपीमध्ये (-) ३२.९ टक्के, तर सिंगापूरच्या जीडीपीमध्ये (-) ४२.९ टक्के घसरण झाली असल्याचं सांगितलं जातंय. जगभरातील देशांच्या जीडीपीमध्ये घसरण झालेली असताना भारताचाच जीडीपी घसरलाय असं म्हणणं योग्य नसल्याचे दावे केले जाताहेत.
हाच कॉपी पेस्ट दावा फेसबुकवर देखील करण्यात येतोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही व्हायरल मेसेजमधील हे आकडे आले कुठून ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डाचे सदस्य असलेल्या एस. गुरुमूर्ती यांचं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये गुरुमूर्ती यांनी विकसित देशांच्या जीडीपीचे आकडे दिले आहेत.
जगभरातील सर्वच देशांच्या जीडीपीमध्ये घसरण (worst gdp drop) झाली आहे, फक्त भारताचाच जीडीपी घसरलाय असं नाही. हे एक जागतिक संकट आहे ज्याचा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही, असं देखील गुरुमूर्ती यांनी म्हंटलंय.
त्यानंतर स्वतः गुरुमूर्ती यांनीच दुसऱ्या दिवशी एक ट्विट करून आपल्या आधीच्या ट्विटमध्ये सुधारणा केली. त्यात त्यांनी म्हंटलंय की अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के नव्हे तर ९.१ टक्के घसरण झालीये. ३३ टक्के हा वार्षिक घसरणीचा आकडा आहे, पण बहुतेक माध्यमांनी हा आकडा पहिल्या तिमाहीतील असल्याचं सांगून दिशाभूल केली. आपण हेच आकडे बघितले होते.
आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांचं देखील एक ट्विट आमच्या बघण्यात आलं. या ट्विटमध्ये त्यांनी जगभरातील देशांच्या जीडीपीचे आकडे दिले आहेत. त्यानुसार अमेरिकेचा जीडीपी (-) ९.१ टक्के तर भारताचा जीडीपी (-) २५.६ राहणार आहे. या आकडेवारीनुसार भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक घसरण झालेली बघायला मिळतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर जीडीपीच्या आकडेवारी संदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक घसरण होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
हे ही वाचा- देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाढ दाखविण्यासाठी भाजपने शेअर केला जुना रिपोर्ट!
Be First to Comment