सोशल मीडियावर टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओसोबत दावा करण्यात येतोय की तेलंगणामध्ये निवडणुका (Telangana Election) होणार आहेत. काँग्रेसकडून घोषणा करण्यात आलीये की जी 11 हॉस्पिटल्स उभारली जातील, त्यामध्ये केवळ मुस्लिमांवर उपचार केले जातील.
हॉस्पिटलमध्ये अगदी आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा हिंदूंवर उपचार केले जाणार नाहीत. शिवाय हॉस्पिटलमध्ये केवळ मुस्लिम डॉक्टरचीच भरती केली जाईल. हिंदूंसाठी कुठलेही आरक्षण असणार नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये अँकर अर्णब गोस्वामी काँग्रेसच्या तेलंगणा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याविषयीची माहिती देताहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने 4 दावे केले आहेत. अर्णब गोस्वामींचे दावे पुढीलप्रमाणे-
- काँग्रेसकडून ‘केवळ मुस्लिमांसाठी’ हॉस्पिटल्स उभारले जाणार असल्याचे आश्वासन. मुस्लिमेतरांना या ‘केवळ मुस्लिमांसाठी’च्या हॉस्पिटल्मध्ये उपचार घेता येणार नाहीत. हिंदूंना हॉस्पिटलमधून हाकलून देण्यात येईल.
- मशीद आणि चर्चसाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन, मात्र हिंदू मंदिरांसाठी आणि गुरुद्वारांसाठी मोफत वीज दिली जाणार नाही.
- नोकऱ्यांमध्ये मुस्लिमेतरांपेक्षा मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य
- केवळ मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिले जाणार 20 लाख रुपयांचे कर्ज, हिंदूंना नाही.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय राजवाडकर यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली आहे.
पडताळणी:
सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता रिपब्लिक टीव्हीच्या वेबसाईटवर 11 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. तेलंगणामधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या संदर्भाने रिपब्लिक टीव्हीवरून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता.
सोशल मीडियावर साधारणतः तीन मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्यतिरिक्त काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भाने इतरही दावे करण्यात आले होते. ते पुढीलप्रमाणे-
- केवळ मुस्लिम इमामांना 6000 रुपये, हिंदू पुजाऱ्यांना नाही?
- केवळ मुस्लिमांसाठी गृहकर्ज, हिंदू आणि शीख समुदायाला कर्ज देखील मिळणार नाही
व्हिडिओमधील अर्णब गोस्वामींच्या दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही काँग्रेसचा तेलंगणा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा मिळवला आणि त्याआधारे प्रत्येक दाव्याची तथ्य तपासणी करण्याचा प्रयत्न केला.
- केवळ मुस्लिमांसाठी हॉस्पिटल्स?
काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्यांक बहुल भागात सरकारी हॉस्पिटल्स उभारण्याचे आश्वसन देण्यात आले होते. जाहीरनाम्यामध्ये कुठेही हॉस्पिटल्स केवळ मुस्लिमांसाठी असतील आणि मुस्लिमेतरांना हॉस्पिटल्समध्ये उपचार घेता येणार नसल्याचे म्हंटलेले नाही.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सरकारी हॉस्पिटल्स उभारले जातील तसेच दंत रुग्णालये आणि दंत चिकित्सकांची संख्या वाढविली जाईल. प्रत्येक प्रभागामध्ये 20-30 खाटांची हॉस्पिटल्स तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते.
2.मशीद आणि चर्चसाठी मोफत वीज, मंदिरांना मात्र नाही?
राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च आणि इतर पूजा-अर्चना स्थळांना मोफत वीज दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. केवळ मशीद आणि चर्चना मोफत वीज दिली जाईल आणि मंदिरांना दिली जाणार नाही, असा उल्लेख कुठेही बघायला मिळाला नाही. सर्व धर्मीय पूजा स्थळांना मोफत विजेचे आश्वासन देण्यात आले होते.
3.नोकऱ्यांमध्ये मुस्लिमेतरांपेक्षा मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य?
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते की अल्पसंख्याक मुस्लिम तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना सरकारी कंत्राट मिळविण्याची संधी दिली जाईल. शिवाय जाहीरनाम्यामध्ये अशीही घोषणा करण्यात आली होती की तेलंगणा आंदोलनातील सहभागी तरुणांना सर्व सरकारी कंत्राटांमध्ये 50% कामे दिली जातील आणि सर्व सरकारी कंत्राटांपैकी पाच टक्के कामे SC, ST आणि इतर गटांसाठी आरक्षित असतील.
4.केवळ मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज, हिंदूंना नाही?
जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते की गरीब अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी 20 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाईल. त्यात असेही सांगण्यात आले होते की SC, ST, अल्पसंख्याक, OBC आणि इतर आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBCs) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 25 लाख रुपयांची मदत दिली जाईल. यातील इतर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये ब्राह्मण, रेड्डी, वैश्य यांचा देखील समावेश आहे. केवळ मुस्लिम विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याचा उल्लेख कुठेही बघायला मिळत नाही.
5. केवळ मुस्लिम इमामांना 6000 रुपये, हिंदू पुजाऱ्यांना नाही?
जाहीरनाम्यामध्ये मशिदीतील इमामांना मानधन देण्याच्या आश्वासनासोबतच राज्यातील ६४३ मंदिरांमध्ये काम करणाऱ्या पुजाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांइतका पगार देण्याचे आश्वसन देखील देण्यात आले होते. याव्यतिरिक्त पादरी आणि फादर यांच्यासाठीच्या मानधनाचा उल्लेख देखील जाहीरनाम्यामध्ये बघायला मिळतोय.
6.केवळ मुस्लिमांसाठी गृहकर्ज?
जाहीरनाम्यात आश्वसन देण्यात आले होते की पात्र अल्पसंख्याकांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचवेळी SC, ST कुटुंबांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी 6 लाख रुपयांच्या मदतीचे आश्वासन देखील देण्यात आले होते.
पडताळणी दरम्यान आम्हाला असे देखील आढळून आले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात खास समुदायाला डोळ्यासमोर ठेऊन देखील काही आश्वासने देण्यात आली होती. ती पुढीलप्रमाणे-
दारिद्र्य रेषेखालील ब्राह्मणांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल तसेच ब्राह्मण महामंडळाचे बजेट ₹200 कोटींपर्यंत वाढविण्यात येईल.
ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठीच्या परिषद योजनेंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठीची उत्पन्नाची मर्यादा ग्रामीण भागात 1.5 लाखांवरून 2 लाख रुपये आणि शहरी भागात 2 लाखांवरून 4 लाख वाढविण्यात येईल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेसच्या तेलंगणा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ‘केवळ मुस्लिमांसाठी’ हॉस्पिटल बनविण्याची आणि मुस्लिमेतरांना येथे उपचार दिले जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली नव्हती. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधील दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.
हेही वाचा- भाजप नेत्यांनी पोस्ट केला ‘नोएडा’ विमानतळाचा म्हणून ‘बीजिंग’ विमानतळाचा फोटो, चीनने फटकारले!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment