Press "Enter" to skip to content

राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कृपेने मंदिरात नमाज पढले जातेय? वाचा सत्य!

राजस्थान कॉंग्रेस सरकारच्या कृपेने मंदिरावर नमाज पढले जातेय आणि विशेष म्हणजे सरकारने त्यांना पोलीस सुरक्षा सुद्धा दिलीय. अशा प्रकारच्या दाव्यासह जयपूरच्या मंदिराचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement
अर्काईव्ह

हेच दावे फेसबुक आणि व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे चेकपोस्ट मराठी’चे वाचक यशवंत पाटील, दत्तू गवाणकर, सुनील कोठावदे आणि राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

याच मंदिराविषयी सुदर्शन न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवरून दोन व्हिडिओज ट्विट करण्यात आले होते. पहिल्या व्हिडिओत एक व्यक्ती दावा करतेय की राजस्थानमधील देवस्थान विभागाने शिव मंदिर बंद पाडले असून मंदिरातील पूजा-अर्चना बंद केली आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंदिराला कुलूप ठोकले आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या वरच्या बाजूला एक मझार बांधण्यात आली आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या समोरील भागाची दृश्ये बघायला मिळतात. त्यातील एका कोपऱ्यावर मजार बघायला मिळतेय.

अर्काइव्ह

सुदर्शन न्यूजने याच व्हिडिओच्या आधारे एक न्यूज रिपोर्ट देखील केला होता. रिपोर्टमध्ये गेहलोत सरकारने मंदिरावर अतिक्रमण करून त्याचे मशिदीत रूपांतर करण्याचा कट रचला असल्याचा आरोप करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

या सर्व घडामोडीस ज्या सुदर्शन न्यूजच्या बातम्यांमुळे सुरुवात झालीय आधी त्यात किती तथ्य आहे ते तपासण्याचा ‘चेकपोस्ट मराठी’ प्रयत्न केला.

सुदर्शन न्यूजच्या बातमीनुसार सदर मंदिर हे जयपूरमधील श्री लक्ष्मीनारायण बाईजी मंदिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच व्हिडिओच्या दुसऱ्या भागातील मंदिराच्या समोरील फुटेजवरून देखील सदर मंदिर हे लक्ष्मीनारायण बाईजी मंदिर असल्याचे स्पष्ट होतेय.

या माहितीच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला यूट्यूबवर आरजे सरोज स्वामी या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये मंदिराविषयीची ऐतिहासिक माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये 6 मिनिटे 45 सेकंदाच्या वेळेवर मजार देखील बघायला मिळतेय. या मजारवर ‘सैयद चांदी वाले बाबा’ असे लिहिलेले बघायला मिळतेय.

Source: Youtube

‘सैयद चांदी वाले बाबा’ यांची ही मजार हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. प्रत्येक गुरुवारी हिंदू-मुस्लिम भाविक या दर्ग्यावर येऊन नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर दर्ग्यावर चादर चढविली जाते. गेल्या 40-50 वर्षांपासून हा दर्गा येथेच असल्याचे तेथील स्थानिक दुकानदारांनी सांगितल्याची माहिती देखील व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

अशोक गेहलोत यांच्या कॉंग्रेस सरकारने ही मजार बसवली?

‘सैयद चांदी वाले बाबा’ यांच्या या मजारविषयी माहिती देत असलेला हा व्हिडीओ युट्युबवर ५ मार्च २०१७ रोजी अपलोड करण्यात आला आहे . लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार डिसेंबर 2018 मध्ये सत्तेत आले होते.

जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर बंद करण्यात आलेले नाही. गेल्या 30-40 वर्षांत कुणालाही याविषयी कसलीही तक्रार नव्हती. कुणीतरी सोशल मीडियात फोटो पोस्ट केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला आहे.

पोलीस नमाज पढणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत?

याविषयी तपास करत असताना ३१ जानेवारी २०२१ रोजी अपलोड झालेल्या ‘नवतेज टीव्ही राजस्थान’च्या बातमीचा व्हिडीओ आम्हाला मिळाला. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की हिंदू संघटनांनी त्या मजारला विरोध दर्शविण्यासाठी त्याखालील शिवमंदिरात अभिषेक केला. व्हिडीओमध्ये दिसत असलेली गर्दी ही संघटनेच्या कार्यकर्त्यांची आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात आहेत. मजारकडे जाण्याचा रस्ताही बंद केला गेलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सुदर्शन न्यूजने चालवलेली बातमी फेक आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकारने शिव मंदिरावर मजार बांधली असल्याचा दावा पूर्णतः चुकीचा आहे. ही मजार जवळपास 40 वर्षांपूर्वीपासून त्याच ठिकाणी आहे. तसेच आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुद्धा चुकीचा आहे. पोलीसफाटा नमाजींना सुरक्षा देण्यासाठी नसून हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिव अभिषेक ठेवला होता, यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी पोलीस तैनात होते.

हेही वाचा- मोदींच्या आदेशाने रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या मुस्लीम घरांत आढळली पुरातन हिंदू मंदिरे? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा