Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही निर्बंधांशिवाय धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्याचे आदेश दिले? वाचा सत्य!

कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. राज्यात कोरोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली असली तरी निर्बंध संपूर्णपणे हटविण्यात आलेले नाहीत. अशात शिवजयंती महोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जातोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुठल्याही निर्बंधांशिवाय धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर हाच मेसेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने व्हायरल होतोय.

FB claims on CM and DCM about Shiv Jayanti celebration
Source: Facebook

पडताळणी:

शिवजयंती साजरी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून काही निर्देश देण्यात आले आहेत का आणि देण्यात आले असल्यास ते नेमके कोणते याविषयी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली.

मटाच्या बातमीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता 500 जणांना उपस्थित राहता यावे, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र, त्याचवेळी आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत, शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण अनुभवावेत, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवजयंतीच्या औचित्यावर शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. मात्र संपूर्ण बातमीमध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही निर्बंधांशिवाय धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख नाही.

इंडिया पोर्टलवर प्रसिद्ध बातमीमध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सरकारने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे, कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता गर्दी टाळून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे, मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता त्याऐवजी केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करणे यांसारख्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही निर्बंधांशिवाय धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले नाहीत. शिवजयंती साजरी करण्यासाठी काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र आरोग्य नियमांचे पालन करूनच शिवजयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

हेही वाचा- पुलवामा हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा