Press "Enter" to skip to content

तेजस्वी यादव यांना लंडनमध्ये उत्कृष्ट तरुण राजकारण्याचा पुरस्कार मिळालाय?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा एक फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की नववीच्या वर्षात नापास झालेल्या तेजस्वी यादव यांना लंडनमध्ये उत्कृष्ट तरुण राजकारण्याचा पुरस्कार (tejashwi yadav award) मिळाला होता.

Advertisement

‘आय सपोर्ट लालू यादव’ या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेला फोटो ३२२ युजर्सकडून शेअर करण्यात आलाय. फेसबुकवर इतरही अनेक जण हे फोटोज शेअर करताहेत.

Source: Facebook

ट्विटरवर देखील हाच फोटो याच दाव्यासह शेअर केला जातोय. तेजस्वी यांच्या शिक्षणावरून त्यांची टिंगल करणाऱ्यांना यातून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

पडताळणी:

तेजस्वी यादव यांच्या व्हायरल फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे आणि खरंच त्यांना व्हायरल दाव्याप्रमाणे लंडनमध्ये उत्कृष्ट तरुण राजकारण्याचा (tejashwi yadav award) पुरस्कार मिळाला होता हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल फोटोज गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले.

आम्हाला खुद्द तेजस्वी यादव यांच्याच अधिकृत ट्विटर हँडलवरून ११ ऑगस्ट २०१६ रोजी हे फोटोज शेअर करण्यात आल्याचे बघायला मिळाले. त्यावेळी तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री होते.

बिहारचे उपमुख्यमंत्री या नात्याने तेजस्वी यांनी लंडन दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी इंस्टीट्यूशन ऑफ सिविल इंजीनियर्स (ICE) कडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमातील परिसंवादातील सहभागाच्या वेळचे हे फोटोज असल्याचं तेजस्वी यांनीच फोटोच्या कॅप्शनच्या माध्यमातून स्पष्ट केलंय.

तेजस्वी यांच्या या दौऱ्याविषयी ‘बोलबिहार’ पोर्टलवर सविस्तर माहिती मिळाली. या रिपोर्टनुसार तेजस्वी ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान इंग्लडमध्ये होते, तर १६ आणि १७ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांनी स्विट्जरलैंडमधील जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. तेजस्वी यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधून बिहारमध्ये असणाऱ्या गुंतवणुकीच्या संधीविषयी चर्चा केली होती. 

तेजस्वी यादव यांनी स्वतःच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केलेल्या फोटोत असो किंवा त्यांच्या लंडन दौऱ्यासंबंधीच्या बातम्यांमध्ये असो, कुठेही त्यांना कुठल्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याचा उल्लेख नाही. सहाजिकच सोशल मीडियावरील दाव्यांना कुठलाही आधार नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लंडनमध्ये उत्कृष्ट तरुण राजकारणी पुरस्कार मिळालेला नाही. बिहारचे उपमुख्यमंत्री या नात्याने तेजस्वी यांनी केलेल्या लंडन दौऱ्यातील फोटोजच्या आधारे सोशल मीडियावर खोटा दावा करण्यात येतोय.  

हे ही वाचा- मतदारांना पैसे वाटताना तेजस्वी यादव कॅमेऱ्यात कैद?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा