“बहुत बड़ी खबर, नेपाल में अब नहीं लगेंगे मस्जिदों पे लाउडस्पीकर !
नेपाल सुप्रीम कोर्ट ने इसे अपराध की श्रेणी में रखा!” अशा कॅप्शनसह नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावणे (loudspeakers in mosques) गुन्हेगारी कृत्य ठरविल्याचे दावे करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
हिंदू एकता मंच, रिपब्लिक भारत, बम बम भोले,भारत माता परिवार, जय हिंदुत्व जय हिंदू राष्ट्र, सनातन संस्कृती, पीएम मोदी टीम, जय श्रीराम भाई प्यार लो प्यार दो अशी नावे असणाऱ्या ग्रुप्स आणि पेजेसवर सदर दावे पोस्ट झाले आहेत. ते सर्व दावे आपण ‘येथे‘ पाहू शकता.
पडताळणी:
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, येथे अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे असे समजून अनेकजण सदर पोस्ट लाईक, शेअर करताहेत. परंतु एवढा मोठा निर्णय जर झाला असेल तर नक्कीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतली असणार. याच विचाराने ‘चेकपोस्ट मराठी’ने संबंधित बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही अशा आशयाची बातमी सापडली नाही.
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. परंतु तेथेही काही सापडले नाही. ‘इंडिया टुडे‘ने नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवक्त्यांना भद्रकाली पोखरेल यांना सदर निर्णयाविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, ‘अशा मागण्या करणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत परंतु माननिय सर्वोच्च न्यायालयाने असा कुठलाही निर्णय दिलेला नाही.’
नोव्हेंबर महिन्यात मुस्लीम समुदायासाठी असे पत्रक जारी केले होते की ज्यात अजाणचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असू नये अशा सूचना होत्या. परंतु त्यास गुन्हेगारीचे स्वरूप देऊन काही ठराविक शिक्षा ठोठावली जाईल असा काहीच उल्लेख त्यात नाही.
या दाव्यांच्या विपरीत म्हणजे नेपाळचे सांस्कृतिक मंत्री योगेश भट्टाराई यांनी असे विधान केले होते की ‘नेपाळ मध्ये मशिदी म्हणजे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतिक आहेत.’ याविषयी बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत नेपाळ सर्वोच्च न्यायालयाने मशिदीवर भोंगे (loudspeakers in mosques) लावण्यास बंदी आणत गुन्हा ठरवले असल्याचे सांगणाऱ्या पोस्ट्स फेक असल्याचे स्पष्ट झाले. या अशा पोस्ट्सद्वारे भारतात धार्मिक ध्रुवीकरणास खतपाणी घातले जात आहे.
हे ही वाचा: मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल करून प्रकाशित करताहेत?
Be First to Comment